‘त्या’ बिबट्याचे सितेपारात दर्शन

0
13

तुमसर,दि.26 : डोंगरला येथे शुक्रवारी दिसलेला बिबटया शनिवारी नवरगाव मार्गे सितेपार येथे गावाशेजारी ग्रामस्थांना दिसला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर वनपरिक्षेत्राधिकारांनी त्यांच्या पथकासोबत सकाळी ९ च्या सुमारास भेट दिली. बिबटयाने धूमाकूळ घातला नाही त्यामुळे त्याला जेरबंद करण्याकरिता उपाययोजना केली नाही अशी माहिती वनअधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. शनिवारी रात्री शिवमंदीर तलावाजवळ काही इसमांना पुन्हा बिबट दिसल्याचे वृत्त आहे.

शुक्रवारी चार ते पाच वर्षाचा बिबटया डोंगरला स्मशानघाटाजवळ मजूरांना पेरूच्या बगीच्यात दिसला होता. आवाज व कल्लोळामुळे बिबटया तिथून निघून गेला. शनिवारी नवरगाव मार्गे तो सितेपार गाव शिवारात ग्रामस्थांना दिसला. त्यामुळे एकच खळबळ माजली. शेतकरी सध्या शेतशिवारात धानाची मळणी करीत आहेत. सकाळच्या सुमारास बिबटया दिसल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली. ग्रामस्थांनी याची माहिती तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी यांना दिली. जोशी एका पथकासोबत तत्काळ सितेपार येथे दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. तथा रात्री-सायंकाळी शेतशिवारात जाऊ नये अशा सूचना दिल्या. सध्या धान मळणी करण्याचे दिवस सुरु आहेत. सितेपार, नवरगाव, तामसवाडी सह इतर परिसरातील गावातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. बिबटयाने हल्ला केला नाही. धूमाकूळ घातला नाही त्यामुळे त्यास जेरबंद करता येत नाही अशी माहिती लोकमतला दिली. बिबटयाच्या वास्तव्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. येथे बिबटयाला जेरबंद करुन जंगलात सोडण्याची गरज निश्चितच आहे. तशी पावले वनविभागाने उचलण्याची गरज आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे येथे ग्रामस्थांचा जीव धोक्यात आहे.