मुंबई – राज्यभरात जानेवारी ते मे 2015 पर्यंत अन्नसाक्षरतेसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दूधभेसळ रोखण्यासाठी लवकरच विशेष फोरम स्थापन करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. दूध उत्पादनाशी निगडित व्यावसायिकांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
दूधभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात विशेष मोहीम राबविली होती. त्या पाहणीत दुधात साखर मिसळली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी जळगाव, कोल्हापूर, मुंबई व ठाण्यातील दूध उत्पादक कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यासंदर्भात मंगळवारी दूध उत्पादक, वितरक व संबंधित “एनजीओं‘ची बैठक एफडीए मुख्यालयाच्या प्रांगणात झाली. या वेळी अशी भेसळ आम्ही करीत नाही, असा दावा करीत ग्राहकांपर्यंत दूध पोचवणारे हे कृत्य करतात, असे कंपन्यांनी सांगितले. काही जणांनी गाई-म्हशींना देण्यात येणाऱ्या उसासारख्या खाद्यामुळे दुधात साखरेचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज व्यक्त केला. वितरकांच्या संघटनेच्या वतीने नाईक यांनी बाजू मांडली.
सर्वसमावेशक फोरम
भेसळ रोखण्यासाठी उत्पादक, वितरक, एनजीओ, अन्न निरीक्षक, प्रसिद्धिमाध्यमे व ग्राहक पंचायतींचे सदस्य असलेला फोरम स्थापन करण्यात येईल. अन्नसाक्षरता मोहिमेनुसार सर्वांनी भेसळ रोखण्यासाठी काय करावे, याबाबत माहिती देण्यात येईल, असे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
उसामुळे दुधात साखर वाढत नाही
गाई-म्हशींच्या खाद्यात उसाचे प्रमाण वाढल्याने दुधात साखर उतरते, हा उत्पादकांचा दावा आयुक्त भापकर यांनी फेटाळून लावला. या दाव्यात तथ्य नाही. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, असे भापकर यांनी स्पष्ट केले.