सत्ताधारी असल्यासारखे वागा- फडणवीस

0
6

नागपूर – “तुम्ही विरोधी पक्षात नव्हे तर आता सत्ताधारी आहात. त्यामुळे आपल्याच पक्षाचा मंत्री अडचणीत येईल, असे वागू नका. तसेच तुमची कामे, तुमचे प्रश्‍न सुटत नसतील, तर मंत्र्यांच्या दालनात चर्चा करा. सभागृहात मंत्र्यांना अडचणीत आणू नका; आता मी हे सहन करणार नाही,‘‘ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना आज खडसावले.

भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, की आपण पंधरा वर्षे सत्तेबाहेर होतो. हे मी समजू शकतो. विरोधी बाकावर राहिल्यामुळे संघर्ष करण्याची सवय झाली आहे. मात्र आता आपण सत्तेत आहेत. सत्ताधाऱ्यासारखे आपण वागले पाहिजे. आपल्याच मंत्र्यांना अडचणीत आणू नका.

पुरोहित मुख्यपक्षप्रतोद
भाजप विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी राज पुरोहित, प्रतोद पदी सुधाकर देशमुख, अतुल भातखळकर, संयज भेगडे, डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील- निलंगेकर, देवयानी फरांदे यांची, तर विधान परिषदेचे प्रतोद म्हणून विजय गिरकर यांची या बैठकीत निवड करण्यात आली.

विखे-पाटील विरोधी पक्षनेते
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांची आज निवड करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विखे यांच्या नावाची घोषणा केली. विखे-पाटील यांच्या निवडीमुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता होण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मनसुबे तूर्तास यशस्वी झाले नाहीत.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय मुंडे यांची निवड झाल्यानंतर आज विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड झाली. विखे यांच्या निवडीमुळे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीविषयी निर्माण झालेली अनिश्‍चितता आता संपली आहे.

विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर दुपारी अध्यक्ष बागडे यांनी निवेदन वाचून दाखवले. या निवदेनात ते म्हणतात, की 4 डिसेंबर रोजी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सहीने गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची, तर 8 डिसेंबर रोजी गटनेते अजित पवार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सहीने आर. आर. पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती.

विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीविषयी अनेक मतमतांतरे झाले. अध्यक्ष या नात्याने मी कायदा विभागाचे प्रधान सचिव, विधिमंडळाचे प्रधान सचिव आणि राज्याचे महाधिवक्ता यांचे सल्ले मागवले. या सर्वांचे सल्ल्ले विचारात घेतले असता एकाच चिन्हावर निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या आमदारांची संख्या असलेल्या पक्षाला हे पद बहाल करायचे, याचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.