अटलजींचं कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व मोठं: गडकरी

0
16

नागपूर: माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून सुशासन दिन साजरा केला.

नागपूरच्या मेयो रुग्णालयात नितीन गडकरी यांनी झाडू हातात घेत रूग्नालयाची स्वच्छता केली. तर आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनीही दिल्लीमध्ये रुग्णालयात जाऊन साफ सफाई केली आणि स्वच्छता मोहीम राबवली.

नागपुरात सकाळी-सकाळी गडकरींनी झाडू हातात घेतला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप खासदार अजय संचेती, आमदार विकास कुंभारे आणि कृष्णा खोपडे हे देखील उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणारे पंडित मदनमोहन मालवीय आणि देशाला विकासाचा मार्ग दाखविणारे अटल बिहारी वाजपेयी हे खऱ्या अर्थाने ‘भारतरत्न’साठी सुयोग्य असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरींनी यावेळी दिली.

अटल बिहारी वाजपेयी यांचं कर्तुत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व मोठं आहे. त्याचं कार्य देश विसरू शकत नाही. त्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा सुशासन दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. आज त्यांचा जन्मदिवस आणि त्यांना भारतरत्न जाहीर झाला आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनादेखील करतो अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली.