२४ फेब्रुवारीला गर्भवती मातांसाठी सभा; पती व सासऱ्यांची राहणार उपस्थिती

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया,दि.१५ : जिल्ह्यातील गर्भवती मातांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुन्य मृत्यू अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत गर्भवती स्त्रीयांच्या आहाराकडे काही ठराविक गावांमध्ये डॉ.एपीजे अब्दूल कलाम सकस आहार योजनेअंतर्गत गर्भवती मातांना योग्य तो आहार दिला जात आहे. इतर गावांमध्ये गर्भवती माता घेत असलेल्या आहारावर आंगणवाडी सेविका, अधिपरिचारीका यांच्यामार्फत नियंत्रण ठेवले जात आहे.
तसेच त्यांच्या नियमीत आरोग्याच्या तपासणीचा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सकामार्फत तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे यांच्या तर शहरी भागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे.या अभियानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जिल्ह्यातील सर्व गर्भवती मातांच्या कुटुंबातील पुरुषांना म्हणजेच पती व सासरे यांना गर्भवती मातेच्या आरोग्याबाबत सतत जागरुक करण्यात येत आहे. त्यांची दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सभा घेण्यात येत आहे. त्यामध्ये या मातेचे दरमहा हिमोग्लोबीन व रक्तदान तपासण्यात येत आहे. त्याची लेखी माहिती त्या कुटुंबातील सदस्यांना देण्याची योजना आहे.या महिन्यातील पुरुष सदस्यांची सभा २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या सभेचे स्थळ आणि वेळ प्रत्येक गावनिहाय ठरविण्याचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करणार आहे. तसेच गोंदिया व तिरोडा नगरपालिका यासह जिल्ह्यातील सर्व नगरपंचायतीमध्ये गर्भवती महिलांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या सभा घेण्याचे नियोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक हे करणार आहे.
सर्व गर्भवती स्त्रीयांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांच्या सभा कधी व कोठे होणार आहे याची माहिती त्यांनी त्यांच्या पत्नीला/सुनेला तपासणाऱ्या आंगणवाडी सेविका/आशा वर्कर/अधिपरिचारिका/डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून जाणून घ्यावीत व त्या दिवशी न चुकता उपस्थित राहून आपल्या पत्नीच्या/सुनेच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
गरोदर महिलांच्या जेवणाची काळजी कुटुंबातील पुरुष सदस्याने दररोज घेणे आवश्यक आहे. यासाठी घरामध्ये रोज हिरव्या पालेभाज्या व फळे विकत घ्यावे किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध होतील यादृष्टीने लक्ष दयावे. गर्भवती स्त्रीला भरपूर प्रमाणात डाळीचे वरण, दूध आणि मांसाहारी असल्यास अंडी किंवा मटन उपलब्ध करुन दिले जाईल याकडे लक्ष दयावे. गर्भवती मातेच्या आहाराकडे नीट लक्ष दिले तरच आपल्याला माता व बालमृत्यू टाळता येईल.सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या गावातील किंवा वार्डातील गर्भवती महिलांच्या घरातील पुरुष सदस्य यांना येत्या शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी न चुकता उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करावे व त्यादिवशी गर्भवती महिलांच्या आरोग्याविषयी चर्चा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.