सांगली : सावकाराच्या जाचामुळे देशोधडीला लागलेली अनेक कुटुंब राज्यात आहेत. सरकारी पातळीवर या सावकारांविरोधात कडक कारवाईची भाषा अनेकदा झाली. मात्र प्रत्यक्षात मात्र काही होत नाही. सांगलीतल्या एका गावानं मात्र सावकाराच्या अन्यायाविरोधात एका कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली जिल्ह्यातल्या दिघंची गावातलं सरताळे कुटुंब आठवडाभरापासून दिवसांपासून उपोषणासाठी बसलं आहे. या कुटुंबाची 6 एकर शेतजमीन सावकारानं अडीच ते तीन लाखांच्या कर्जापोटी बळकावली आहे. अमोल मोरे असं या सावकाराचं नाव आहे. सरताळेंची ही जमीन नोटरी करुन त्यानं आपल्या नावावरही करुन घेतली. त्यांना अमोल मोरेचा आता धमकावण्याचेही प्रयत्न सुरु आहे. या त्रासाला कंटाळून त्यांनी अखेर उपोषणाचा निर्णय घेतला.
सावकाराच्या अन्यायाच्या अशा घटना राज्यात अनेक घडतात. मात्र दिघंची गावात या कुटुंबाच्या मदतीसाठी सारं गाव धावलं.सावकाराचं देणं देण्यासाठी ग्रामसभेत वर्गणी गोळा करायचं ठरलं आहे. जेणेकरुन सावकाराचं देणं फिटेल आणि सरताळे कुटुंबियांची जमीन त्यांना परत मिळेल. त्यामुळं आता गावानं सरताळे परिवाराच्या मागे उभे राहात, सावकाराला चोख उत्तर देण्याचं ठरवलं आहे. सरपंच हणमंतराव देशमुख यांनी याबाबत माहिती देत पीडित परिवाराच्या मागे सारं गाव असल्याचं सांगितलं.
सावकारांनी हडप केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देऊ अशा गर्जना याआधीच्या सरकारमध्येही अनेकदा झाल्या. पण ना या जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या, ना सावकारांची मुजोरी कमी झाली. पण अशा अन्यायाविरोधात दिघंची गावानं दाखवलेली एकजूट मात्र प्रेरणादायी आहे.