१७ व्यसनमुक्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
18

गडचिरोली दि. 4 –: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले जवान व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस विभागाच्या मार्फतीने व्यसनमुक्तीचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या संकल्पमुक्तीचा शुभारंभ जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला.
या कार्यशाळेला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, १९२ बटालियन सीआरपीएफचे कमांडंट मनोजकुमार, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, सर्च फाऊंडेशनचे उप संचालक तुषार खोरगडे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आरती बंग, डॉ. योगेश पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते. जानेवारी महिन्यात संकल्पमुक्तीचा पहिला सत्र घेण्यात आला. या सत्रात जिल्हा पोलीस व सीआरपीएफचे २५ जवान सहभागी झाले होते. त्यापैकी १७ कर्मचाऱ्यांनी स्वत:ला व्यसनमुक्त केले आहे. सत्र क्रमांक २ मध्येही जवानांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रथम सत्रामध्ये व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शरीर सशक्त व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जवानाने व्यसनांपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, संचालन पोलीस उपनिरिक्षक तेजस्वी पाटील, तर आभार विनोद पांडे यांनी मानले.