पार्वतीबाईंच्या कविता विद्यापीठांनी अभ्यासक्रमात आणाव्यात- डॉ. बोरकर

0
20

नागपूर- अल्पशब्दांमध्ये आशय मांजण्याचे सामर्थ्य असलेल्या पार्वतीबाई देशमुख यांच्या कविता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन झाडीबोलीचे गाढे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी केले.
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शंकरनगरातील कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर सभागृहात आयोजित
काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी डॉ. बोरकर बोलत होते. डॉ. बोरकर यांच्या हस्ते पार्वतीबाई देशमुख यांच्या ‘उजळणी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित होते. याप्रसंगी कवयत्री पार्वतीबाई देशमुख यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. समीक्षक प्रा. देवानंक सोनटक्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बहिणाबाईंपासून पार्वतीबाईपर्यंत ज्यांनी बोली साहित्यात मोठे योगदान दिले, त्यांच्यामुळे मराठी भाषा जिवंत राहिली. दुर्दैवाने पार्वतीबाईंच्या कवितांमध्ये जे संदर्भ आहेत. ते केव्हाच अस्तंगत झाले. यातील शब्द, संदर्भ नव्या पिढीला कळणार नाहीत. मात्र, बोली भाषेत बोलणारी आणि जगणारी एक व्यक्ती आमच्यात वाढली, याचा आनंद आहे. आजचे कवी इतरांच्या कविता वाचून लिहितात, असा आक्षेपही त्यांनी घेतला आणि त्याचवेळी पार्वतीबाईंनी ज्ञानेश्वर, केशवसूत वाचले नाहीत, हे सुदैव असल्याचे शेराही डॉ. बोरकर यांनी दिला.
प्रा. देवानंद सोनटक्के म्हणाले बहिणाबाईंच्या कवितेत तत्वज्ञान आहे. पार्वतीबाई जीवनाचे आकलन मांडतात. साक्षर-निरक्षरतेचे संदर्भ त्यांना लागू होत नाहीत. अशी कविती कधीच ठरवून लिहिता येत नाही. यात देशियतेचे भान आणि लोकतत्वही आहे. कापूस वेचताना जे मनात येईल ते शब्द जोडून मी गाण म्हणायचे. संपूर्ण आयुष्य जंगलात-वावरात गेले, अशी भावना व्यक्त करून कापूस ‘येचते, चंद्र हासते…’, ‘झाडाझाडावर कशी चांदणी दिसते’, या स्वतःच्या ओळीही पार्वतीबाईंनी ऐकवल्या. यावेळी अनुजा तातावार यांच्या अल्बम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आधारचे अध्यक्ष डॉ. अविनाश रोडे, पार्वतीबाईंचे सुपूत्र सुरेश देखमुख यांची उपस्थिती होती. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.