आज आंबेडकर महाविद्यालयात खा.येचुरीचे व्याख्यान

0
6

नागपूर,दि.१८(berartimes.com)- विद्यापीठाने नकार दिला असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व खासदार सीताराम येचुरी आज शनिवारी (ता. १८) नागपूरमध्ये येणार आहेत. दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने पुढाकार घेऊन त्यांचे व्याख्यान महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता आयोजित केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दीक्षान्त सभागृहातील खासदार सीताराम येचुरी यांचे व्याख्यान रद्द केल्याने वाद निर्माण झाला. आंबेडकरवादी व पुरोगामी विचारांच्या अनेकांनी कुलगुरू डॉ. काणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन येचुरींचे भाषण रद्द केल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने खासदार येचुरी यांचे ‘लोकशाहीचा ऱ्हास : आव्हाने व उपाय’ या विषयांवर दोन दिवसांचे व्याख्यान आयोजित केले होते. परंतु, गेल्या बुधवारी अचानकपणे कुलगुरूंनी डॉ. आंबेडकर अध्यासनाच्या प्रमुखांना पत्र पाठवून येचुरींचे व्याख्यान अनिश्‍चित काळासाठी रद्द केल्याचे कळविले. कुलगुरूंच्या या निर्णयाने खळबळ उडाली.
आता येचुरींचे व्याख्यान होणार नाही, असे वाटत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने पुढाकार घेत त्याच विषयावर खासदार येचुरी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र विभागांच्या वतीने हे व्याख्यान आयोजित केल्याचे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी कळविले आहे.