ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन

0
20

पुणे, दि. २ – अवकाश संशोधन, हवामान शास्त्र या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचे शुक्रवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाची पाया रचणा-या शास्त्रज्ञाचे निधन झाले अशी भावना व्यक्त होत आहे.

पुण्यात जन्मलेले वसंत गोवारीकर यांनी वयाच्या ११ वर्षी यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत शोधली होती. त्यांच्या या शोधासाठी त्यांचे सर्वत्र कौतुकही झाले होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. बीएससी आणि मग एमएससी केल्यावर गोवारीकर यांनी इंग्लंडमध्ये प्रवाही पदार्थ या विषयावर पीएचडी केली. वयाच्या २८ व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेत रिसर्च सेंटरमध्ये ते क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी गेले होते. मात्र अमेरिकेत न रमता ते पुन्हा भारतात परतले. १९६५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये त्यांनी उपग्रह तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली एसएलव्ही – ३ हा उपग्रह वाहक तयार झाला व त्यांच्या कामासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुकही केले होते.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि १९९२ ते १९९३ या कालावधीत पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार त्यांनी काम केले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून त्यांनी काम केले असून तब्बल सहा वर्ष ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. लोकसंख्येवर भाष्य करणारे ‘आय – प्रेडीक्ट’ हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. भिंतीआड बसून संशोधन करता मूलभूत समस्यांची जाणीव असणारे शास्त्रज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते.