ग्रामविकास योजनांचा निधी आता सांसद आदर्श ग्राम योजनेकडे

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर-ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध ग्रामविकास योजनांचा निधी आता सांसद आदर्श ग्राम योजनेकडे वळविण्यात येणार आहे.
गावाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास करण्यासाठी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ग्रामीण विकास आणि स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात गावाचा भौतिक विकास आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील. या योजनेअंर्तगत प्रत्येक खासदारला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास २०१६ पर्यंत करावयाचा आहे, परंतु या योजनेसाठी कुठल्याही प्रकारची वेगळी तरतूद करण्यात आलेली नाही.
सांसद आदर्श ग्राम योजनेकरिता साडेतीन ते पाच हजार लोकवस्ती असलेल्या गावाची निवड करणे आवश्यक आहे. जिल्ह्य़ातील गटविकास अधिकाऱ्यामार्फत गावाच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. गावात कोणत्या सुविधा आहेत, कोणत्या प्राथमिक सुविधांची आवश्यकता आहे, तसेच पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षणाची सोय आदीबद्दल माहिती गोळा करण्यात येणार आहे. गावाचा विकास होण्याकरिता आवश्यकतेनुसार सुविधा निर्माण करण्यासाठी खासदार निधीतील काही रक्कम आणि अस्तित्त्वात असलेल्या ग्राम विकासाच्या योजनांचा निधी येथे खर्च करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून सांसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली, परंतु त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूदच करण्यात आली नाही. खासदारांना त्यांच्या निधीतून त्या गावात संपूर्ण विकास एका वर्षांत करावा लागणार आहे. खासदारांना एक वर्षांला पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्यातील बहुतांश निधी या योजनेत खर्च केल्यास मतदारसंघातील अन्य कामे अडकून पडतील म्हणून काही खासदारांनी सांसद आदर्श ग्राम योजनेकरिता वेगळ्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे, परंतु त्यासंदर्भात अद्याप कोणत्याही निर्णय झालेला नाही. याविषयी बोलताना नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा म्हणाले की, या योजनेसाठी अद्याप तरी स्वतंत्र निधीची तरतूद नाही. जिल्हा नियोजन समितीकडे वेगवेगळ्या योजनांचा निधी असतो. या निधींचे एकत्रिकरण करून सांसद आदर्श ग्राम योजनेवर खर्च केला जाईल.