समाजमन घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची- आ. राजेंद्र जैन

0
64
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पत्रकार दिन थाटात साजरा
गोंदिया, दि.६ : देशातील नागरिक विचारांनी परिपूर्ण झाले आहे. याचे सर्व श्रेय पत्रकार व माध्यमांना आहे. माध्यमांमध्ये प्रचंड ताकद आहे. उत्कृष्ट व दर्जेदार पत्रकारितेमुळे सत्याची बाजू नेहमीच बळकट झाली आहे. याची प्रचीती देशाला वारंवार आली आहे. समाजमन घडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्‍वाची आहे. असे प्रतिपादन आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
आज (ता.६) प्रदेश लघु वृत्तपत्र संपादक संघ गोंदिया, जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राईस मिलर्स असोसिएशन सभागृहात आयोजित पत्रकार दिवस समारोहात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष कशिश जायसवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जेष्ठ पत्रकार ॲड.विरेंद्र जायसवाल, नगरपालिका मुख्याधिकारी सुमंत मोरे, राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल उपस्थित होते.
आमदार जैन पुढे म्हणाले, समाजामध्ये पत्रकारांची चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी पत्रकारांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. कारण पत्रकारांची कार्ये, भूमिका व जबाबदारी सारखीच असते. समाजाला काय दयावे व काय देवू नये हे पत्रकार ठरवितात. म्हणूनच प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्वाचा दूवा म्हणजे पत्रकार व त्यांनी केलेली दर्जेदार पत्रकारीता होय असेही ते म्हणाले.
नगराध्यक्ष कशिश जायसवाल म्हणाले, जसा आपला दृष्टीकोन असेल तसे जग आपल्याला दिसेल. म्हणून निष्पक्ष पत्रकारीतेसाठी निष्पक्ष दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. ॲड.विरेंद्र जायसवाल म्हणाले, आरसा सत्याचे प्रतिनिधीत्व करतो तीच सत्यता आपल्या लेखणीतून पत्रकारांनी समाजापर्यंत पोहोचवायला हवी.
यावेळी ङ्कवर्तमानपत्रांची आवश्यकता व नागरिक, पत्रकार व प्रशासनाची भूमिकाङ्क या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादात आपले मनोगत व्यक्त करतांना चंद्रकांत खंडेलवाल यांनी पत्रकारीता एक आंदोलन असून समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्याचे ते साधन असल्याचे सांगितले. राधेश्याम शर्मा म्हणाले, पत्रकारीतेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करायचा असेल तर बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारीतेतील गुण आपण अवगत करायला हवे. श्री चौबे म्हणाले की, माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. शब्दांना धार असते व त्याचा उपयोग करतांना पत्रकारांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पराग तिवारी यांनी प्रशासनातील समस्येला पत्रकारांनी वाचा फोडावी असे सांगितले. रमेश शर्मा म्हणाले, दर्पण या नावातच सत्‍य बोलण्याची शक्ती दडली आहे. स्वार्थासाठी मनुष्य खोटे बोलतो तेव्हा सत्यतेची प्रचीतीसाठी त्याने दर्पणमध्ये बघावे व सत्यता स्वीकार करावी. अनिल गौतम यांनी पत्रकारीतेचे महत्व विशद केले. डॉ.सुवर्णा हुबेकर व ॲड.अनंत दिक्षीत, आदी वाचकांनीही परिसंवादातील विषयावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अतुल दूबे यांनी केले, तर आभार अशोक सहारे यांनी मानले. कार्यक्रमाला पत्रकारबांधव, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी आणि वृत्तपत्र वाचक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक सहारे, चंद्रकांत खंडेलवाल, चंद्रकांत पांडे, अतुल दुबे यांनी परिश्रम घेतले