इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीची पत्रकारिता आव्हानात्मक

0
25

गडचिरोली-महाराष्टाच्या टोकावर वसलेल्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारांना आपली लेखणी चालून सामाजातील भरकटलेल्या जनसामान्यांना या माध्यमातून न्याय मिळवून काय कसरत करावी लागते, याचा जर आपण इतर जिल्ह्याच्या तुलनेत विचार केला असता खर्‍या अर्थाने येथील पत्रकारिता अधिक आव्हानात्मक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केले.
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकार भवनात गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्यानपंडित गणपती सातपुते व मास्टर माईंड तुहिन मडावी यांना गडचिरोली प्रेस क्लबचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून खासदार नेते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे, तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, समाजकल्याण सभापती विश्‍वास भोवते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते आदींची उपस्थिती होती.
खासदार नेते म्हणाले की, समाजात घडणार्‍या विविध घडामोंडीची माहिती देत पत्रकार हा समाज जागृतीचे मोलाचे कार्य करीत असतो. पक्षपातीपणा न करता निर्भिडपणे कार्य करीत असतात. लोकशाही टिकविण्यामागे पत्रकारांचे मोलाचे योगदान असून, विकासाचा गाडा समोर नेतांना पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये सामजंस्य असणे महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी आपली लेखणीचा उपयोग जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला बाहेर काढून जिल्हा विकास घडवून आणण्यासाठी करावे, असेही खासदार नेते यावेळी म्हणाले.
प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे यांनी, स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता तसेच आता असलेली स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता याच्यात काय फरक आहे, यावर प्रकाश टाकला. तसेच इत्तर जिल्ह्यांच्या पत्रकारितेच्या तुलनेत येथील पत्रकारीता करीत असताना कोणत्या अडचणींना समोर जावे लागते, दुर्गम भागात जाऊन वृत्तसंकलन करताना संबंधित पत्रकारांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते, हे सांगत पत्रकारांसाठीचा सुरक्षिततेचा कायदा अमलात आणणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आमदार डॉ. होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा उत्साह वाढावा तसेच विद्यार्थ्यांनी बोध घेऊन त्यांचा गौरव वाढविण्यासाठी केलेले कार्य हे उल्लेखनिय असल्याचे आज देण्यात आलेल्या जिल्हा गौरव पुरस्कारावरून नक्कीच सिद्ध होते. प्रेस क्लबच्या वतीने अशाप्रकारचा उपक्रम सुरू केल्याने आणि दरवर्षी देण्यात येत असलेल्या पुरस्काराने जिल्ह्यातील जनसामन्य जनतेला आदर्श ठरणारा असल्याचे मत आमदार डॉ. होळी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे उपध्यक्ष जीवन नाट, समाजकल्याण सभापती यांनीही आजच्या स्थितीत पत्रकारांचे योगदान, त्यांच्या माध्यमातून समाजाला व गोरगरिबांना मिळत असलेला न्याय आणि त्यासाठी पत्रकारांची लागत अससेली कसरत यावर उपस्थिताना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार, भाजपाचे प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, डॉ. भारत खटी, राकॉं नेते प्रकाश ताकसांडे, चंद्रशेखर भडांगे, डॉ. प्रकाश किरकिरे, रेखा डोळस, जनार्दन साखरे, श्याम वाढई यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोतराव मेश्राम यांनी केले. संचालन अरविंद खोब्रागडे यांनी तर आभार विलास दशमुखे यांनी मानले.