नागपूर – मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचे शहर असल्याने नागपूरचे वेगळे महत्त्व आहे. शहराची स्वच्छ, सुंदर शहर अशी प्रतिमा असून त्यात आणखी भर घालण्याची संधी मिळाली. नागपूरला मॉडेल शहर करायचं आहे, असे मत नवनियुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सूत्रे स्वीकारल्यानंतर व्यक्त केले.
यांनी आज महापालिकेतील त्यांच्या कक्षात मावळते आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. महापालिकेची आर्थिक स्थिती, प्रशासनातील कामकाज, शहराच्या विकासासंबंधी विविध संस्थांसोबत समन्वय आदी विषयावर चर्चा करीत त्यांनी शहराचा नूर पालटण्यासाठी लोकसहभागावर भर दिला. महापालिकेला स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले, नागरिकांची कर भरण्याची मानसिकता असते. त्यामुळे नागरिकांसाठी ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी पाऊले उचलले जातील. महापालिकेच्या आर्थिक स्थिती तसेच विविध बाबींचा अभ्यास करणार आहे. शहराला मॉडेल शहर म्हणून विकसित करण्यासाठी सुबत्ता व सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी प्रशासनावरच जबाबदारी झटकून चालणार नाही, प्रत्येक नागरिकाने योगदान देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. शहराच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यास असो की इतर संस्था, प्रत्येकासोबतच समन्वयाने कामे केली जातील. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी उत्तम प्रशासनावर भर राहणार आहे. प्रशासनात संवेदनशीलता व समर्पित वृत्ती तयार करणार असल्याचे नमूद करीत त्यांनी कणखर निर्णयाचेही संकेत दिले. प्रशासनाचा कार्यभार सांभाळल्यानंतर लगेच राज्य शासनाकडून अपेक्षा सांगता येणार नाही, परंतु महापालिकेला आत्मनिर्भर करणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, मावळते आयुक्त श्याम वर्धने यांना महापालिकेतर्फे निरोप देण्यात आला. या वेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समिती अध्यक्ष बाल्या बोरकर, दयाशंकर तिवारी, मनपातील उपायुक्त, विभागप्रमुख, सहायक आयुक्त उपस्थित होते.