शेतक-यांबाबत भारतीय जनता पक्षाचे सरकार उदासीन!

0
13

औरंगाबाद -शेतक-यांच्या समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार उदासीन असून, झोपेचे सोंग घेतलेल्या दोन्ही सरकारांना जागे करण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा आज काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय दुष्काळ पाहणी समितीच्या बैठकीत देण्यात आला.
राज्यातील दुष्काळाची समीक्षा करण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्तांच्या समस्या सरकारकडे मांडून त्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थापन केलेल्या मराठवाडा विभागीय दुष्काळ पाहणी समितीची बैठक तापडिया रंगमंदीर, निराला बाजार येथे पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे व माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीला मार्गदर्शन करताना आ.श्री ठाकरे यांनी भाजपचा शेतक-यांप्रती दुजाभाव उघड केला. ते म्हणाले की, भयावह दुष्काळ असतानाही भाजपच्या सरकारकडून अद्याप भरीव थेट मदत मिळालेली नाही. मदत तर सोडाच पण् शेतीमालाला योग्य किंमत देणेही या सरकारला शक्य झालेले नाही. अनेक पिकांचे उत्पादन कमी झाले असतानाही त्यांना गतवर्षीपेक्षाही कमी भाव मिळाला आहे. दुष्काळ आणि शेतक-यांबाबत सरकार अजिबात गंभीर नाही. या सरकारच्या धोरणात शेतक-यांना स्थानच नाही. त्यांचे निर्णय फक्त पैसेवाल्यांसाठीच होत आहेत. काँग्रेस नेहमीच शेतक-यांसोबत, सामान्यांसोबत राहिली आहे. सत्तेत असतानाही कॉंग्रेस पक्ष शेतकरी आणि गरीबांच्या बाजूने उभा होता आणि आता सत्तेच नसतानाही त्यांच्याच पाठीशी राहिल, असा विश्वास त्यांनी दिला.
खा.श्री अशोक चव्हाण यांनी देखील मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण स्थिती मांडून सरकारच्या उदासीनतेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वेगाने वाढते आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करीत आला आहे. दुष्काळावर काँग्रेसला राजकारण करायचे नाही. परंतु, या भयावह परिस्थितीला तोंड देताना काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने पावले उचलली होती, तसा पुढाकार भाजपच्या विद्यमान सरकारकडून दिसत नाही. ही बाब चीड आणणारी आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांची दारूण परिस्थिती सरकारसमोर मांडून त्यांना जागे करण्यासाठी काँग्रेसच्या विभागीय दुष्काळ पाहणी समित्या कार्यान्वीत झाल्या आहेत. शेतक-यांना योग्य ती मदत देण्यासाठी आम्ही सरकारला बाध्य करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीनंतर काँग्रेसच्या मराठवाडा विभागीय दुष्काळ पाहणी समितीचे जिल्हानिहाय दौरे सुरू होणार आहेत. तत्पूर्वी झालेल्या या बैठकीला आ.श्री अब्दुल सत्तार, आ.श्री बसवराज पाटील मुरूमकर, आ.श्री अमर राजूरकर, श्री सुरेश जेथलिया, श्री. एम.एम. शेख, प्रदेश सरचिटणीस श्री अरूण मुगदिया, औरंगाबादचे शहराध्यक्ष श्री सैय्यद अक्रम, औरंगाबाद जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री केशवराव औताडे, श्री सर्जेराव कदम आदी नेते उपस्थित होते.