झाडीबोली साहित्याला अभ्यासक्रमात स्थान द्या
सालेकसा-झाडीबोलीच्या साहित्यिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, झाडीबोलीचे प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचे विदर्भ साहित्य संमेलनाध्यक्षपदी नियुक्ती करावी, झाडीबोली साहित्य संमेलनाकरिता शासनाने अनुदान द्यावे, झाडीबोली साहित्याला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावे, गोंदिया-बल्लारशादरम्यान चालणाऱ्या रेल्वेगाडीला ‘झाडीपट्टी एक्स्प्रेस’ नाव देण्यात यावे, असे विविध ठराव २२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्रात घेण्यात आले.
संमेलनाध्यक्ष प्रा. धनराज ओक यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी समारोप सोहळा झाला. व्यासपीठावर शरद काथवटे, मागासवर्गीय संस्थेच्या अध्यक्षा शालिनी बडोले, प्रा. भगवान साखरे, डॉ. गोपाल हलमारे, वनक्षेत्राधिकारी बी. जी. देंडे उपस्थित होते. मायबोलीच्या विविध विषयांवर प्रा. ओक यांनी विचार व्यक्त केले. तत्पूर्वी कविसंमेलन, परिसंवाद व परिचर्चा झाल्या. सकाळी ९ वाजता दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. अस्सल झाडीबोलीतील कवितांनी संमेलनाला बहर आली. अध्यक्षस्थानी बाबुराव टोंगे होते. डोमा कापगते, मधुकर गराठे, दिवाकर मोरस्कर, हिरामन लांजे, लखनसिंह कटरे, डॉ. हेमकृष्ण कापगते, वा. च. ठाकरे, मिलींद रंगारी, विजय मेश्राम, पांडुरंग भेलावे, विष्णू भेंडारकर, मधुकर कुरसुंगे, दौलतखाँ पठाण, अंजनाबाई खुणे, धनंजय उके, नरेंद्र बोरीकर, रमण पारधी, पवन पाथोडे, लोकेश नागरीकर, उल्हास चन्नेकर, शर्मानंद नंदेश्वर, एम. पी. बागडे, रेखा कटरे आदी कवी यात सहभागी झाले होते.प्रा. खांडेकर म्हणाले, ‘तुझ्या प्रत्येक भेटीत, मी तुझ्यासाठी नवा असतो; तुझ्याशी काहीच बोलत नाही, तरीही तुला मी हवा असतो…’ ही कविता सादर केली.
यानंतर ‘मीच बोलीचा मारेकरी’या विषयावर परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी डॉ. राजन जायस्वाल होते. सुधाकर मार्गोनवार, डॉ. मनोहर नरांजे, बंडोपंत बोडेकर, दिवाकर मोरस्कर, पांडुरंग भेलावे सहभागी झाले होते. यानंतर ‘माझी बोली शब्दाची ढोली’ या विषयावर परिचर्चा झाली. परिचर्चेच्या अध्यक्षस्थानी डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे होते. संचालन प्रा. ज्योती बोरकर, पूजा बन्सोड व आभार खुशाल साखरे यांनी मानले.
पुरस्कार अन् पुस्तक प्रकाशन
संमेलनादरम्यान गजानंद बाडगे कविता पुरस्कार बंडोपंत बोडेकर यांना प्रदान करण्यात आला. घनश्याम डोंगरे शोध पुरस्कार चंद्रपूरचे डॉ. शाम मोहरकर (झाडीपट्टी रंगभूमी) यांना तर द. सा. बोरकर आत्मकथा पुरस्कार अंजनाबाई खुणे यांच्या ‘झाडीचा झोलना’ला देण्यात आला. प्राणज्योत (पवन पाथोडे), माझी जीवननौका (डोमा कापगते), श्रद्धा सुमन भजनावली (डोमा कापगते), सोन्याचा पिंजरा (हिरामण लांजे), चिंतन बुढापे का (धनराज ओक), मोतीराम बाबा अभंगावली (सुभाष धकाते), सावित्रीच्या लेकी (शशिकला गावतुरे), साजोनी (सुखदेव चौथाले) या झाडीबोलीतील पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.