नागपूर-स्थापनेपासूनच घोटाळ्यांचा शाप लागलेल्या बहूचर्चित महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील (माफसू) पदभरती घोटाळ्यात अखेर १४ जणांवर शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार माजी कुलगुरू डॉ. अरुण निनावे आणि तत्कालिन कुलसचिव डॉ. आर. एल. ढोबळेसह या १४ घोटाळेबाजांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयासमक्ष हजर केल्यानंतर हे चार्जशिट दाखल करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेल्या साडेतीन हजार पानांच्या आरोपपत्रात या आरोपींवर पदाचा दुरुपयोग करणे, पुरावे नष्ट करणे, कागदपत्रांची फेरफार, प्रशासनाची दिशाभूल यासह अन्य गंभीर आरोप निश्चित केले आहेत.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात जुलै २००६-२००७मध्ये १००७ पदांसाठी भरती घेण्यात आली. त्यापैकी ७५० तांत्रिक आणि अतांत्रिक पदे भरण्याचे शासनाकडून मंजूर झाले. यापैकी ४५९ पदे भरताना २००७-०८मध्ये झालेल्या पदभरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुलाखत प्रक्रियेतील उमेदवारांनी केला. लिपिकापासून प्राध्यापकपदापर्यंत झालेल्या भरतीत भ्रष्टाचाराची पशुवैद्यकांची तक्रार होती. तत्कालीन राज्यपाल डॉ. एस. सी. जमीर यांनी याप्रकरणी फेब्रुवारी २००९मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त आनंद लिमये यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. जुलै २००९मध्ये या समितीचा अहवाल राज्यपालांना सादर झाला. समितीपुढे आलेल्या तक्रारींनुसार भरतीप्रक्रियेत अनियमितता आढळली.
राज्यपालांनी पदभरतीप्रकरणी आरोप झालेले तत्कालीन कुलगुरू डॉ. अरुण निनावे यांचे निलंबनही केले होते. राज्य शासनाची धोंडगे समिती आणि विद्यापीठ स्तरावरील डॉ. एम. बी. भुसारी समितीनेदेखील चौकशी करून हा अहवाल प्रभारी कुलगुरूंकडे सोपविला होता. लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून देखील ‘माफसू’तील गैरप्रकाराची तपासणी सुरू होती. दरम्यान २०१०मध्ये एसीबीचे तत्कालिन अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजेश दुद्धलवार यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर ३,८८० पानांचा अहवाल तयार करण्यात आला. या प्रकरणात एकूण ५० जणांवर दोषारोप ठेवून ९ मे २०१२ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणात मध्यंतरी एसीबीच्या पथकाने आरोपी तत्कालीन कुलगुरू डॉ. अरुण निनावे याच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली होती. यात नागपुरातील लाखो रुपयांच्या खरेदी-विक्रीचे दस्तऐवज आढळले. ते जप्त करण्यात आले होते. डॉ. निनावे याच्याशिवाय पथकाने तत्कालीन कुलसचिव डॉ. ढोबळेच्याही घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पथकाला डॉ. ढोबळेची स्टेट बँक ऑफ इंडियात पाच लाखांची जमाठेव आढळली. एसीबीने या संबंधिचेही दस्तऐवज जप्त केले. दिल्लीसह महाराष्ट्रातील २८ ठिकाणी एकाचवेळी एसीबीने झडतीसत्र राबविले होते. या कारवाईमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली होती. या घडामोडीत आरोपींनी न्यायालयातून अटकपूर्व जामिनही मिळविला होता. त्यात आता दोषारोपपत्र दाखल करताना थेट माजी कुलगुरू आणि कुलसचिवांवर आरोप असल्याने कुलपतींची परवानगी आवश्यक आहे. त्यांनतरच कायदेशीर प्रक्रिया केली जाते. आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात विद्यमान कुलपती आणि राज्यपाल सीएच विद्यासागर राव यांच्या परवानगीनंतर शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले.
हे आहेत आरोपी
डॉ. अरुण निनावे (माजी कुलगुरू), डॉ. आर. एल. ढोबळे (माजी कुलसचिव), नारायण खेडकर, झाकीर अली, डी. बी. सरोदे, विजय काळबांडे, सुभाष बेलसले, अशोक धार्मिक, एस. डी. चव्हाण, अशोक झंजाळ, एम. बी. पाटील, डी. एस. बाजड, एल. एस. भोसले, शितेवार.