वहानगावच्या ग्रामसभेत एकमताने दारूविक्री करण्याचा ठराव पास

0
24

चंद्रपूर,दि.04 – जिल्ह्य़ात दारूबंदी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच घेण्यात आला, या निर्णयाचे सर्वांनी स्वागतही केले. दारूबंदी करण्याकरिता चारशेच्या वर ग्राम पंचयतीने ठराव घेतला. त्यामध्ये चिमुर तालुक्यातील वहानगावचाही समावेश होता. परंतु आता दारूबंदी जिल्ह्य़ातट ग्रामपंचायतमध्ये बोर्ड लावून दारु विक्री करण्याचा अफलातून निर्णय २ सप्टेंबरला चिमूर तालुक्यातील वहानगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता सरळ दारू वाहनगाव ग्रामपंचायत मध्येच मिळणार आहे. ही तळीरामांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयावर पालकमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्य़ात दारूबंदीनंतर मोठा उत्साह साजरा करण्यात आला होता. मात्र दारूबंदीच्या काही महिन्यातच दारूबंदीचा फज्जा उडाला. शहरासह ग्रामीण भागातही दारूविक्री सर्रासपणे सुरू झाली. यात अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मोठी माया जमविली. परिणामी चंद्रपूर जिल्ह्य़ाची परिस्थिती गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यासारखीच झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. दारूबंदीची घोषणा ही कौतुकास्पद होती मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरल्यानेच गावागावात अवैध दारुविक्रीला ऊत आले होते.