सुशिक्षितच सर्वाधिक लाचखोर, एसीबी महासंचालक प्रवीण दीक्षित

0
10

पिंपरी-चिंचवड : डॉक्टर, वकील, अभियंते, तलाठी यांसारख्या लोकांचा भ्रष्टाचारात समावेश असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे समाजातील सुशिक्षित लोकांकडूनच सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे, असे परखड मत राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले. राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे 33 कोटींची संपत्ती आढळून आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रोटरी क्लब ऑफ चिंचवडतर्फे आयोजित शिशिर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘भ्रष्टाचार आपण थांबवू शकतो का ?’ या विषयावर ते बोलत होते. त्यांच्या हस्ते सहायक आयुक्त प्रकाश शिंदे यांना सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधिक्षक डॉ. दिगंबर प्रधान आदी उपस्थित होते.

गेल्या वर्षभरात राज्यात लाचलुचपतीसंदर्भातील 1,245 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आणि त्यामधून अडीच कोटी रुपये तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले. राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांकडे 33 कोटींची संपत्ती आढळून आली आहे, अशी माहिती दीक्षित यांनी दिली.