भंडारा-जाती निर्मूलनासाठी शासनाने आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना ५0 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु समाजकल्याण विभागातर्फे मंजूरीप्राप्त ४२ जोडपी या अनुदानापासून वंचित आहेत.सन २0१३-१४ मध्ये भंडारा जिल्ह्यातील ८४ जोडप्यांचे अर्ज मंजूर करुन त्यांना अनुदान वितरीत करण्यात आले. यात तीन जोडप्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे, उर्वरीत ८१ जोडप्यांना ५0 हजार रुपयांप्रमाणे असे ४0.९५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. २0१४-१५ मध्ये भंडारा जिल्ह्यातील ९८ जोडप्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाने मंजूर केले. त्यापैकी ५४ जोडप्यांना २७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. दोन नवविवाहितांचा मृत्यू झाल्यामुळे अनुदान वाटप प्रक्रियेसंदर्भात आयुक्तांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. उर्वरित ४२ जोडपी अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना प्रत्येकी ५0 हजार रुपयांप्रमाणे २१ लाख रुपये वाटप व्हायचे आहेत.
राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. या योजनेअंतर्गत समित्यांना गावात लोकोपयोगी, समाजोपयोगी व जातीय निर्मूलन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या मोहीमेला लोकचळवळीचे स्वरुप आल्यामुळे गावकर्यांनी गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा राखण्याचे काम करीत आहेत. शासनाच्या आंतरजातीय विवाह योजना तंटामुक्त गाव समिती यशस्वीरित्या राबवित आहे.आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्याला समाजकल्याण विभागातर्फे ५0हजार रु पये अनुदान दिले जाते.
भंडारा जिल्ह्यात तंटामुक्त गाव समितींनी घडवून आणलेल्या आंतरजातीय विवाहबध्द जोडप्यांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. समाज कल्याण विभागाच्या जागृतीअभावी या दाम्पत्यांना मदत मिळाली नाही. सामूहिक विवाह सोहळयात लग्न करणार्या जोडप्यांना कन्यादान योजनेंतर्गत ११ हजार रुपये दिले जाते. मात्न ही जोडपी तंटामुक्त समित्यांकडे विवाहबध्द झाल्यास त्यांना मदत मिळत नाही. यासाठी तंटामुक्त समित्यांनी विवाहबध्द जोडप्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागात अर्ज करणे गरजेचे आहे. मात्न तंटामुक्त समित्यांचा उदासिनतेमुळे विवाहबध्द जोडपी लाभापासून वंचित आहेत.