सात वर्षांत 21 हजार गावे तंटामुक्त

0
27

मुंबई-राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व गावस्तरावरील तब्बल 28 हजार 613 समित्यांनी हजारो गावे तंटामुक्त करण्याच्या शासनाच्या बहुआयामी मोहिमेला आकार दिला आहे. विविध 12 लाख 71 हजार 956 दाखल तंट्यांपैकी दोन लाख 64 हजार 697 तंट्यांचा शांततेने निपटारा झाला. परिणामी सात वर्षांत राज्यातील 21 हजारांवर गावांनी तंटामुक्त होण्याचा बहुमान मिळविला आहे.

तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत राज्यात 31 हजार 122 ग्रामसुरक्षा दले स्थापन झाल्याने आज अनेक गावे स्वरक्षणासाठी सिद्ध झाली आहेत. परिणामी ही मोहिमेची मोठी उपलब्धता असल्याचे मानले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातून पोलिस विभागावर राहणारा ताण कमी झाला आहे. यामध्ये अनेक न्यायप्रविष्ट प्रकरणांचाही यशस्वीपणे निपटारा करण्यात आला. राज्यस्तरावरील अभ्यास समितीने आखून दिलेला आराखडा प्रत्यक्ष गावात पोचविण्याची मोठी जबाबदारी विभागीय, जिल्हा, तालुका व पोलिस ठाणे स्तरावरील समित्यांवर सोपविण्यात आली.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 33 जिल्हा सल्लागार व अंमलबजावणी समित्या, 33 जिल्हास्तर तज्ज्ञ समित्या, 726 पोलिस ठाणे स्तरावरील समित्या, मूल्यमापनासाठी 347 समित्या स्थापन झाल्या आहेत. समित्यांच्या या जाळ्यामुळे गावातील एकही तंटा ठाण्यात जाऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. शासन पुरस्काराच्या स्वरूपात देत असलेल्या कोट्यवधी रुपयांपेक्षा गावागावात निर्माण होत असलेला एकोपा, शांतता व प्रगती महत्त्वाची ठरली आहे.