‘संशोधनातून सामान्यांच्या समस्या सोडवा ‘-राज्यपाल सी. विद्यासागर राव

0
45

नागपूर – देशाने प्रगती केली असली तरी आजही अनेक समस्या कायम आहेत. विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करून सामान्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आंतरविद्यापीठ संशोधन “आविष्कार 2014‘ महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक प्रो. के. एम. एल. पाठक, कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, कुलसचिव व्ही. व्ही. राणे, डॉ. एल. बी. सरकटे, डॉ. एन. एन. झाडे उपस्थित होते.

ज्ञानातून तंत्रज्ञानाची निर्मिती तर तंत्रज्ञानातून नवनवीन संकल्पना तयार होत असल्याचे सांगून राज्यपाल राव म्हणाले, या संकल्पनेतून देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होतो. प्रगतीनंतरही आजही भूक, गरिबीसारख्या अनेक समस्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी संशोधनच कामात येईल. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्‍न आहे. तो कसा सोडविता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत. देशातील युवकांमध्ये बरीच क्षमता आहे. ती ओळखून योग्य युवकांना दिशा दाखविण्याची गरज आहे. केवळ देशच नव्हे तर जगाच्या कल्याणासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. प्रो. पाठक यांनी युवकांच्या क्रिएटिव्ह डोक्‍यातून आलेल्या संकल्पनांना बळ देत, त्यातून नवा भारत घडवावा, असे आवाहन केले. डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांनी महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. संचालन रेणुका देशकर यांनी केले, तर आभार डॉ. एस. व्ही. उपाध्ये यांनी मानले.

महोत्सवात मानव्यशास्त्र, व्यवस्थापन, विधी, प्युअर सायन्स, अभियांत्रिकी, पशू व मत्स्यविज्ञान, मेडिकल आणि औषधनिर्माण विभागातील संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वगळता 19 विद्यापीठांतील 584 विद्यार्थी सहभागी होतील. यात 305 मुले आणि 279 मुलींचा समावेश आहे. त्यासाठी आमदार निवासात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. त्यातच प्रकल्प सादर केला आहे. याशिवाय 500 पोस्टर्सचाही समावेश त्यात केला आहे.