नर्सरी प्रवेशासाठी वयोमर्यादा तीन वर्षे

0
48

मुंबई – पूर्व प्राथमिक म्हणजेच प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी या वर्गांसाठी वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. नेमक्‍या कोणत्या वयात मुलांना प्रवेश द्यायचा, याबाबत अद्याप एकवाक्‍यता नव्हती. याचा फायदा अनेक खासगी, बड्या, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळा उठवत आपली मनमानी करत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने प्रथमच पुढाकार घेत यात एकवाक्‍यता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत सरकारचा आदेश (जीआर) बुधवारी (ता. 21) जारी करण्यात आला. त्यानुसार प्ले ग्रुप आणि नर्सरीची वयोमर्यादा तीन वर्षे अशी निश्‍चित करण्यात आली आहे आणि ती राज्य मंडळासह सर्व बोर्डांना बंधनकारक आहे. प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी प्रवेश घेताना त्या वर्षीच्या 31 जुलैला मुलाचे किमान वय तीन वर्षे असावे. प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठीच्या या निर्णयाची अंमलबजावणी 2015-16 पासून होणार आहे. इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेताना त्या वर्षीच्या 31 जुलैला मुलाचे किमान वय सहा वर्षे असावे. इयत्ता पहिलीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी 2018-19 या वर्षापासून लागू होणार आहे. तोपर्यंत पहिलीची वयोमर्यादा प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या 31 जुलैच्या वयानुसार अशी असेल ः 2015-16 साठी पाच वर्षे पूर्ण, 2016-17 साठी पाच वर्षे चार महिने पूर्ण, 2017-18 साठी पाच वर्षे आठ महिने पूर्ण, 2018-19 साठी सहा वर्षे पूर्ण.

शाळा प्रवेशासाठी मुलांची वयोमर्यादा निश्‍चित करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या शिफारशीनुसार ही वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे.