विरली खंदारच्या महिलांची दारुबंदीसाठी मोहिम

0
12

पवनी,दि.06 : तालुक्यातील अड्याळहून पाच कि.मी. अंतरावरील विरली खंदार गावातील चौकात मोठ्या प्रमाणात मोहफुलाची आणि देशी दारूची विक्री सुरू असल्याने त्या विरोधात गावातील महिलांना संघटित होऊन आक्रमक भूमिका घेत दारू विक्रेत्यांना यापूढे दारू विकणार नाही, असे पत्र त्यांच्याकडून लिहून घेत दारुबंदी मोहिमेला सुरवात केली आहे.विशेष म्हणजे या दारुबंदी मोहिमेत लोकप्रतिनिधी स्वरुपातील महिलांचा सहभाग कमी आणि सामान्य महिलांचा सर्वाधिक सहभाग असल्याने पोलीसांनाही महिलांच्या या आंदोलनाला पाठबळ द्यावे लागले आहे.
दारूच्या व्यसनामुळे घरात नेहमी होणाºया भांडणामुळे पाच-सहा महिलांना यापूर्वी जीव गमवावा लागला. गावात यापूर्वी तिनदा दारूबंदी होऊनही पुन्हा दारूविक्री झालीच कशी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याला ग्रामस्थ की अड्याळ पोलीस जबाबदार असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. विरली खंदार या गावातील एका महिलेच्या घरी व्यसनाधिन पतीने दारुच्या नशेत पत्नीला बेदम मारले. त्यामुळे संपूर्ण महिला व ग्रामस्थ एकत्र येऊन असा प्रकार गावात पुन्हा कोणत्याही महिलेबाबत होऊ नये, यासाठी गावातील दारुबंदी उपक्रम राबविण्यासाठी सुरूवात केली. येथील महिलांनी तीन दिवसात शेकडो लिटर दारू पकडून अड्याळ पोलीस ठाण्यात जमा केले. गावातील चौकात हा व्यवसाय एवढा फोफावला होता की, त्या ठिकाणी महिला व मुलींचे जाणे येणे सुद्धा कठीण झाले होते. कारण पिणारे व्यसनाधिन लोक एवढ््या बेफाट अपशब्दात बोलायचे की त्यामुळेच तिथून महिला मंडळी येजा करीत नसत. परंतु मुख्य मार्ग एकच असल्यामुळे नाईलाजास्तव जावे लागत राहिले. गावात शांतता राहावी, गावातील दारुबंदी समितीच्या महिला पदाधिकाºयांनी पुढाकार घेतला आहे.