दिव्यांग मुलांनाही समजतेय वन्यजीवांची भाषा

0
25

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा विशेष उपक्रम
गोंदिया,दि.७ : वन्यजीव सप्ताहामध्ये सर्वसाधारणपणे इंग्रजी माध्यम ते मराठी व इतर भाषांमध्ये शिकणाऱ्या मुलांना, शाळांना आणि शिक्षकांना सहभागी करुन घेतले जाते. मात्र ज्यांना बोलता वा ऐकता येत नाही किंवा योग्यपणे बघता येत नाही अशा मुलांना देखील वने, वन्यजीवांचे हे विश्व उलगडून दाखविले तर किती चांगले होईल अशाच उद्देशाने गोंदिया स्थित नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांनी हिरवळ बहुउद्देशीय संस्था आणि सातपुडा फाऊंडेशन संस्था गोंदिया यांचे सहकार्याने गेल्यावर्षी पासून गोंदिया येथील मंगलम मूक बधीर विद्यालयात तेथील मुलांना या कार्यक्रमात सहभागी करुन घ्यायला सुरुवात केली. गेल्यावर्षी वन्यजीव संरक्षणाचे गीत, ऐकता येत नसून सुध्दा सादर केलेले भावपूर्ण गाणे आणि त्यानंतर समारोप समारंभात त्यांनी केवळ अविर्भाव समजून केलेले नृत्य सर्वांना हेलावून गेले होते. त्यानंतर त्यांना दिवसाची नागझिरा भेट घडवून निसर्गामध्ये केवळ डोळ्यांची हावभावाची भाषा वापरुन वने व वन्यजीवांचे महत्व सांगण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील या शाळेतील ८५ मुलांना वन्यजीव सप्ताहामध्ये सामील करुन घेण्यात आले. वन्यजीव विषयक चित्रकला स्पर्धा, हावभावाचे राष्ट्रगान आणि विविध कृती तयार करणे हे त्यांनी सहजरित्या केले. यावर्षी या शाळेमध्ये ३ व ५ ऑक्टोबर २०१७ या दोन दिवशीय कार्यक्रम घेण्यात आला. गेल्यावर्षी नागझिरा अभयारण्यात वाघ आणि ठतर वन्यप्राणी यांचेविषयी दिलेली माहिती त्यांनी यावर्षी चित्रकलेत व्यवस्थीतपणे दिसून येत होती. मुक वन्यप्राण्याची भाषा समजण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन विभागाला मुक परंतू अत्यंत प्रतिभावान मुलांची भाषा समजण्यास अडचण गेली नाही व जी भाषेची अडचण होती ती त्यांचे सर्व शिक्षक आणि हिरवळचे सदस्य यांनी चांगल्याप्रकारे पूर्ण केली व भविष्यात देखील समाजातील अशा थोड्याशा दुर्लक्षीत घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियाचा प्रयत्न राहणार आहे.