अहिल्यादेवी होळकर पुरस्कार अर्ज मागविले

0
27

गोंदिया,दि.७ : राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०१७-१८ या वर्षासाठीच्या पुरस्काराकरीता इच्छुक व्यक्ती/संस्थांकडून ३० दिवसाच्या आत अर्ज मागविण्यात येत आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी १ लाख १ रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान २५ वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे ५ वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
विभागीय पुरस्कारासाठी २५ हजार १ रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप असून यासाठी महिला व बालविकास क्षेत्रात संस्थेचे किमान ७ वर्षे कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेत दलित मित्र पुरस्कार नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी तसेच संस्थेचे कार्य व सेवाही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी १० हजार १ रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला व बालविकास क्षेत्रात किमान १० वर्षे सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.
या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थांनी विहित नमून्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गजानन कॉलनी, अंगुर बगीचा रोड, गोंदिया येथे संपर्क साधावा व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह आपला प्रस्ताव सादर करावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,गोंदिया यांनी कळविले आहे.