शेतकऱ्यांनो ! किडनाशके फवारतांना काळजी घ्या

0
11

कृषि विभागाने सूचविल्या उपाययोजना
गोंदिया,दि.७: जिल्ह्यातील मुख्य पीक भात असून जिल्ह्यात सप्टेबर अखेर ७१४.७ मि.मी. इतके पर्जन्यमान झाले. वार्षिक पर्जन्यमानाच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. १५१५३७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची रोवणी करण्यात आली. परंतू वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता यामुळे भात पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी किडनाशकाची फवारणी सुरु केलेली आहे. किडनाशके फवारणी करतांना शेतकरी बांधवांनी अशाप्रकारे विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे व जि.प.कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.
पिकावरील कीड व रोग यांचे नियंत्रण करतांना किडनाशके वापरतांना ती काळजीपूर्वक हाताळली नाही तर शेतकरी किंवा पाळीव प्राणी यांच्या जीवास अपायकारक ठरु शकतात. कारण किडनाशके फवारतांना रासायनिक औषधाचे बारीक कण हवेबरोबर नाक, तोंड, त्वचा किंवा डोळ्याद्वारे शरीरात जातात, त्यामुळे जीवास हानी पोहचू शकते. यासाठी किडनाशके वापरण्यापूर्वी लेबल व माहिती वाचून खबरदारीच्या सूचनांचे पालन करावे. जोराचा वारा वाहत असल्यास फवारणी टाळावी. फवारणीचे वेळी तंबाखू, बिडी, गुटखा, पान आदिचे सेवन करु नये. तणनाशके व किडनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा तसेच गळते फवारणी यंत्र न वापरता दुरुस्त करुन वापरावे. फवारणी करतेवेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. फवारणी झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. किटकनाशकाच्या बाटल्या वापरानंतर नष्ट कराव्यात. धोकादायक किडनाशके वापरतांना संरक्षण कपडे जसे रबरी हातमोजे, चष्मा, रबरी बुट, लांब पायजामा घालावा व फवारणी सहा तासापेक्षा जास्त वेळ करु नये.
किटकनाशके पोटात गेले असल्यास प्रथमोपचारासाठी पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यासाठी भाग पाडावे. त्यासाठी १५ ग्रॅम मीठ, ग्लासभर कोमट पाण्यातून पिण्यास दयावे. उलटीद्वारे पाणी स्वच्छ येईपर्यंत ही कृती करावी. हाताची बोटे अथवा चमच्याचा टोकाकडील भाग घशात घालूनही उलट्या करुन घ्याव्यात. जर रोग्याला सारख्या उलट्या होत असतील तर वरील उपचार करु नये. श्वसनाद्वारे किडनाशकाची विषबाधा झाली असल्यास रुग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे. खिडक्या व द्वारे उघडावे. रुग्णाचे कपडे सैल करावे. श्वासोच्छवास नियमीत होत नसल्यास त्याला कृत्रिम श्वासोच्छवास दयावा. त्वचेवर किडनाशके पडल्यास त्वचा पाण्याने त्वरित धूवून काढावी. त्वचा साबन आणि पाण्याची पूर्णपणे धुवून काढावी. डोळ्यात किडनाशके गेल्यास ताबडतोब पाण्याचा प्रवाह डोळ्यात सोडून डोळे धुवावेत. डॉक्टर येईपर्यंत सतत डोळे धुत राहावे.
किडनाशकाची फवारणी करतांना किडनाशक पोटात जावून विषबाधा झाल्यास तात्काळ डॉक्टराला बोलवावे. तोपर्यंत पोटात गेलेले विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यास भाग पाडावे. श्वसनाद्वारे विषबाधा झाल्यास रुग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत ठेवावे. रोग्याला घाम येत असल्यास स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसावे.