वीज पडून मृत्यू आता राज्य आपत्तीच्या यादीत

0
6

गोंदिया,दि.06 – वीज पडून मृत्यू झाल्यास त्याचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसाना चार लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या संदर्भातील आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे.

राज्यात पावसाळ्यामध्ये वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार वीज पडून होणाऱ्या मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तींच्या यादीत नव्हता. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 31 मे रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून झालेले मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. वीज पडून मृत्यू झाल्यास योग्य मृताच्या वारसाला चार लाख रुपये मदत दिली जाणार आहे. याशिवाय जखमी झालेल्यांनाही द्यावयाच्या मदतीची रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे.

अशी मिळेल मदत (रक्कम रुपयांत)
– मरण पावल्यास – 4 लाख
– 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास – 59 हजार 100
– 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास – 2 लाख
– आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात – 4300
– आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रुग्णालयात – 12 हजार 700