तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ द्यावा

0
16

पुणे : सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अशा महान संताला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एऩ पठाण यांनी केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, जि. अमरावती व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माजी आमदार उल्हास पवार तसेच सेवा मंडळाचे प्रकाश वाघ, रूपराव वाघ, बबनराव वानखेडे, जनार्दन बोथे, डॉ. रघुनाथ वाडेकर आणि माजी पोलीस अधिकारी विक्रम बोके उपस्थित होते.

भा. ल़ ठाणगे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सुरेंद्र नावाडे, मुरलीधर जडे, गणेश चौधरी, संजयकुमार दळवी यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. पठाण म्हणाले, ‘‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतीय अस्मिता सांभाळत सर्वधर्मसमभावाचा संदेश जनमानसात रुजविला. अंधश्रद्धा, बुवाबाजी यांचा प्रखर विरोध करीत तीर्थक्षेत्राकडे न जाता जमीन कसून शेतीची कास धरावी, असे विचार ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मांडत सर्वसामान्यांना जगण्याचे बळ दिले. सध्या शिक्षण व्यवस्थेला पांढरपेशी स्वरूप प्राप्त झाले असून, शिक्षणाला कौशल्याची जोड देणारे हे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान आहे. यासाठी शिक्षणाचे महत्त्व सांगणारी त्यांची ‘ग्रामगीता’ शिकवली गेली पाहिजे. अयोध्येत मंदिर आणि मशिदीचा वाद मिटलेला नाही. त्यामुळे या वादात पडण्यापेक्षा अयोध्येला ‘मानवता मंदिर’ उभारले जावे, ज्यातून एकात्मकतेचा संदेश दिला जाईल.

नव्या पिढीला जे माहीत नाही, ते देण्याचे काम अशा संमेलनामधून होते, असे सांगून उल्हास पवार म्हणाले, की हे संमेलन म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची शिदोरी आहे. विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा संयोग झाला नाहीतर इसिस वगैरेसारख्या संघटना डोके वर काढतात. मानवतेचा व्यापक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या लेखनातून पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले.