सभागृहासाठी मिळणार पाच लाख

0
9

कालीमाटी : विदर्भ तेली समाज महासंघ आमगाव अंतर्गत परमपूज्य संताजी जगनाडे महाराज व संत तुकाराम महाराज जनजागृती सेवा ट्रस्टच्या वतीने कातुर्ली येथील ग्रामपंचायतच्या पटांगणावर मंगळवारी तेली समाजाचा तालुकास्तरीय मेळावा पार पडला. सकाळी गावात दिंडी व प्रभात फेरी काढण्यात आली. दुपारी १ वाजता संत जगनाडे महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
तेली समाज मेळाव्याचे उद््घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून आमगाव तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष सोमेश्‍वर पडोळे होते. मार्गदर्शक म्हणून ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम. करमकर, बॅरि. राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोलाचे प्राचार्य सागर काटेखाये, युवा अध्यक्ष भाष्कर येरणे, स्वागताध्यक्ष सुभाष आकरे, प्रा. किशोर निखारे, सचिव कुवरलाल कारंजेकर, जानकीप्रसाद हटवार, शंकरराव क्षीरसागर, लिलाधर गिर्‍हेपुंजे, डॉ. जशवंतराव बावनकर, प्रेमलाल बिसेन, सेवानवृत्त मुख्याध्यापक घनशाम साठवणे, खेमराम बावणकर, सुखराम महारवाडे उपस्थित होते.
याप्रसंगी आ. संजय पुराम यांनी सभामंडपासाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच संतांनी समाजाला नवी दिशा देण्याकरिता प्रबोधन केल्याचे सांगून त्यांची सदैव आठवण ठेवणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून तेली समाजातील दहावी व बारावीच्या परीक्षेमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सन २00५ मध्ये बेवारटोला (सालेकसा) येथे नक्षलवाद्यांशी लढा देणार्‍या पोलीस शिपाई जयंत हुकरे यांना १ मे २0१५ रोजी मिळणार्‍या राष्ट्रपती शौर्य पदकाबद्दल शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कातुर्ली येथील फुलनबाई साठवणे यांनी आपले वडील लटारू बिसेन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तेली समाजाला संत जगनाडे महाराज व संत तुकाराम यांच्या मूर्ती भेट दिल्याबद्दल त्यांचा व पती घनश्याम साठवणे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक गोपीचंद भेलावे यांनी तर संचालन व आभार छत्रपाल बिसेन यांनी केले. कार्यक्रमसाठी समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच गावकर्‍यांनी सहकार्य केले. शेवटी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.याप्रसंगी मोठय़ा संख्येने समाजबांधव व भगिणी उपस्थित होत्या.