बेळगावमध्ये नाट्य संमेलनाला नाट्य दिंडीने थाटात सुरुवात, मराठी लोकांची निदर्शने

0
18

बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव- 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनास बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत थाटात व प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. नाट्यदिंडीने या संमेलनाला सुरुवात झाली तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन केले.
बेळगावकर रसिक मंडळी व महाराष्ट्रातून आलेले रंगकर्मी यांच्या उपस्थितीत स्वागत करून नाट्यसंमेलनाचा पडदा उघडला गेला. उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र दांडी मारली. दरम्यान, मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यसंमेलन ठिकाणी निदर्शने करीत घोषणाबाजी करून गोंधळ घातला. बेळगावचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे असे सांगत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यामुळे काही वेळ उद्घाटन समारंभा लांबला. तरीही तब्बल 60 वर्षांनंतर बेळगावात नाट्य संमेलन होत असल्याने नाट्यरसिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याचे दिसून आले.
आज सकाळी निघलेल्या नाट्यदिंडीनंतर या संमेलनाचे उद्घाटन झाले. या दिंडी सोहळ्यात अनेक रंगकर्मींनी सहभाग नोंदवला. त्यानंतर शरद पवारांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचा पडदा उघडण्यात आला. दोन दिवस चालणा-या नाट्यसंमेलनात संमेलनाध्यक्षा फैयाज शेख यांची मुलाखत व कलावंत रजनी यांचे आकर्षण आहे. रविवार सकाळी विषय नियामक समितीची सभा होत असून त्यात मांडण्यात येणा-या ठरावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
कर्नाटक सरकार विरोधात कोणत्याही ठरावावर चर्चाही झालेली नाही, असेही नाट्य परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले. बेळगावच्या नाट्य रसिकांना पुन्हा एकदा मराठी नाटके बघण्याची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे नाट्य संमेलन महत्त्वाचे ठरणार असून खंडित झालेली नाट्यपरंपरा पुन्हा एकदा सुरू होत आहे, ही महत्त्वाची घटना म्हणावी लागेल, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
कानडी पोलिसांनी जाचक अटी घातल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाट्य संमेलनाच्या समारोपाला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणा-या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारत समारोपाला जाण्याचे ठरविल्याचे समजते आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आज बेळगावमध्ये आहेत.
नाट्यसंमेलनातील ठळक बाबी…
– सकाळी नऊ वाजता नाट्यदिंडीने नाट्यसंमेलनाला सुरुवात
– सकाळी 11 वाजता नाट्यसंमेलन उद्घाटळ सोहळ्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शने
– बेळगावाचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश झालाच पाहिजे अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा
– त्यामुळे उद्घाटन समारंभ काही वेळ लांबला
– अखेर साडेआकराच्या सुमारास शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन
– नाट्यसंमेलनाचे मावळते अध्यक्ष अरूण काकडे यांचा सत्कार
– अरूण काकडे यांच्याकडून फैयाज यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे
– अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाचे अध्यक्ष मोहन जोशींनी संमेलन आयोजकांचे आभार मानले.
– आत्माराम भेंडेंना पवारांची श्रद्धांजली
– भालचंद्र नेमाडेंनी मराठी भाषेचा गौरव केला
– बेळगावची जनता नेहमी प्रेम देते
– बेळगावकरांची आणि आमची भौगोलिक ताटातुट झाली असली तरी मन अभंग आहेत
– प्रांतवादानंतरही बेळगावची मराठी नाळ जुळलेली
– रंगभूमीची रया चालली आहे ते लयाला जाते की काय अशी भीती वाटते
– नाटकाच्या एका प्रयोगाला मिळणारे मानधन पाहिले की वाईट वाटते
– नाटक मोठ्या शहरातून तालुक्याच्या ठिकाणी जावं
– लहान शहरात थिएटर उभारली पाहिजेत, जी आहेत त्यांची बिकट अवस्था आहे
– रंगभूमीला मिळणारे मानधन तुंटपुंजे
– राज्य सरकारने रंगभूमी जीवंत ठेवण्यासाठी मदत केली पाहिजे