ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

0
10

पुणे, दि. ७ – ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे शनिवारी निधन झाले. ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आज बेळगावमध्ये उद्घाटन होत असतानाच भेंडे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने संमेलनावर दु:खाची छाया पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ९३ वर्षीय आत्माराम भेंडे यांनी पुण्यातील रत्ना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरही कामाचा ठसा उमटवला. झोपी गेलेला जागा झाला, तरूण तुर्क म्हातारे अर्क, पिलूचं लग्न, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे, तुज आहे तुजपाशी, मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरी अशी अनेक नाटकं गाजली.
जाहिरात व चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजली.