माणसाला विचारशील करण्याची ताकद फक्त ग्रंथातच – शैलेश पांडे

0
5

चंद्रपूर : जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्या. या सर्व क्रांतीमध्ये अक्षरांनी घडविलेली वैचारिक शक्ती आहे. माणसाला विचारशील करण्याची ताकद फक्त ग्रंथातच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक शैलेश पांडे यांनी केले.

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, जिल्हा ग्रंथालय अधिकारी व ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युबिली हायस्कुलच्या प्रांगणात चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पांडे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, वाचन विकास प्रकल्पाचे संयोजक डॉ. गजानन कोटेवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी एस. जे. कोरे, ज्येष्ठ पत्रकार मुरली मनोहर व्यास, ज्युबिली हायस्कूलचे प्राचार्य उद्धव डांगे व सुचित कुळकर्णी उपस्थित होते.

श्री. पांडे म्हणाले, उत्तम लेखक होण्यासाठी आधी उत्तम वाचक व्हावे लागते. त्यानंतरच अनुभवसंपन्न ग्रंथाची निर्मिती होऊ शकते. ज्या साहित्यामध्ये वर्तमानाचे प्रतिबिंब उमटते ते साहित्य त्या त्या पिढीत वाचले जाते. मुलावर जुने साहित्य न लादता त्यांना त्यांच्या पिढीतील लिहिलेले साहित्य वाचायला दिले तर मुले वाचनाकडे आकर्षित होतील. माणसांपर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे काम पुस्तक करीत असले तरी कुठले ज्ञान दीर्घ उपयोगी आहे, हे निवडण्याची कला ज्याला जमली तो ज्ञानी होईल.

ग्रामीण भागात वाचन संस्कृती बळकट करण्याची गरज असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक शाळा तेथे ग्रंथालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्रीमती गुरुनुले यांनी सांगितले.

श्री. बोरगमवार म्हणाले, ग्रंथ माणसाच्या आयुष्यात बदल घडवू शकतात, जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. या ग्रंथोत्सवात प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एक तरी ग्रंथ विकत घ्यावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गिते यांनी तर सूत्रसंचालन कल्पना बनसोड यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षणाधिकारी रवीकांत देशपांडे यांनी मानले. ग्रंथोत्सवात नामांकित प्रकाशकांचे 26 स्टॉल लागले असून प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 या काळात सर्वांसाठी खुले असणार आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. अनिल बोरगमवार यांनी ग्रंथपूजन करुन दिंडीस सुरुवात केली. कला शिक्षक सुदर्शन बारापात्रे, मोरेश्वर बारसागडे, गजानन पिदूरकर यांनी ग्रंथदिंडी आयोजित केली. गांधी चौक, जटपूरा गेट ते ज्युबिली हायस्कूल अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीचे चौका-चौकात शाळांनी, नागरिकांनी स्वागत केले.