मनोहरभाई पटेल जनसेवेला सर्मपित व्यक्तिमत्त्व

0
14

आपल्या जनसेवेच्या कार्यामुळेच स्व. मनोहरभाई पटेल दीर्घकाळापर्यंत गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनमाणसांच्या स्मृतीत कायम अंकीत झाले आहेत. बहुतांश व्यक्ती असे असतात की ज्यांना स्वत:चीच चिंता राहते, परंतु स्व. मनोहरभाई पटेल हे अंतिम क्षणापर्यंत परहिताकरिता सर्मपित राहिले.
साधारण नोकरीच्या भरवश्यावर त्यांनी आपल्या जीवनाची सुरवात केली. तशा परिस्थितीतही ते दुसर्‍यांना सहकार्य करण्यास नेहमी तत्पर राहायचे. आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. त्याचे शल्य त्यांना होते, परंतु त्यांचे भाग्य प्रबळ होते आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्यावर त्यांनी इतरांना शिक्षण प्राप्त करून देण्यास जीवनाचे प्राधान्य ठरविले. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासह माध्यमिक, महाविद्यालयीन व उच्च शिक्षणाची दारे उघडून शैक्षणिक क्रांती आणली.
त्यांचे पुत्र श्री प्रफुल्ल पटेल यांनी मनोहरभाईंच्या स्वप्नाला गती देऊन गोंदिया शिक्षण संस्थेची केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्णविदर्भात आपली एक वेगळी ओळख मिळवून दिली.
मनोहरभाई पटेल जरी शिक्षणापासून वंचित राहिले, तरी प्रत्येक क्षेत्रात त्यांचे नाव आजही मोठे आहे.
राजकारणात राज्यातच नव्हे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाचे नाव घेतले गेले. समाजकारणासाठी राजकारण हा मंत्र संपूर्ण जीवन जगल्याने आणि जनसेवा हेच जीवनाचे र्मम त्यांनी जाणल्याने जनसेवेचे असे कोणतेही क्षेत्र नाही जे मनोहरभाईंपासून दूर राहिले. त्यांच्या ११२ व्या जयंतीप्रसंगी आम्ही सर्वांची त्यांना भावपूर्ण आदरांजली.