हत्तीरोग प्रतिबंधक औषधीचे वाटप उद्यापासून

0
17

गोंदिया,दि.९ः-राष्ट्रीय कीटकनाशक रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १0 ते १४ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात हत्तीरोग प्रतिबंधक औषधीचे वाटप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभागृहात पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती.
पत्रपरिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्यामसुंदर निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व अधिकारी व पत्रकारांना हत्तीरोग प्रतिबंधक औषधीचे वाटप करून करण्यात आली.
पुढे माहिती देतांना डॉ. चौरागडे यांनी सांगितले, या कार्यक्रमातंर्गत समाजातील हत्तीरोग जंतूभार कमी करणे व हत्तीरोगाचा प्रसार थांबविणे, हायड्रोसील व हत्तीपाय रुग्णांना विकृतीपासून दूर ठेवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून नागरिकांना डीईसी व अल्बेंडाझॉल औषधाच्या गोळय़ा प्रत्यक्ष घरी जावून खाऊ घातल्या जाणार आहे. जिल्ह्यात १0 ते १२ फेब्रुवारीदरम्यान ग्रामीण भागात आणि १0 ते १४ फेब्रुवारी दरम्यान शहरी भागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी लोकसंख्या १३ लाख ७८ हजार ३७0 असून एकूण अपेक्षित लाभार्थी १२ लाख ८१ हजार ८८४ ग्राह्य धरण्यात आले आहे. याकरिता ग्रामीण भागाकरिता १५८८ व शहरी भागाकरिता १३६ असे एकूण १७२४ कर्मचारी व १७२ पर्यवेक्षक काम करणार आहेत. २0१७ मध्ये हत्तीपायाचे ८९९ रूग्ण व अंडवृद्धीचे १९३६ रूग्ण आढळल्याचे सांगून अंडवृद्धी शस्त्रक्रिया २९५ रुग्णांवर करण्यात आली आहे. नागरिकांना हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्यामसुंदर निमगडे यांनी केले आहे.