नागझिर्यातील रुपाचे होणार ताडोबात स्थानांतर

0
18

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.10 : वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्यवनसरंक्षक यांनी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील रुपा हत्तीनला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तर  गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश स्थानिक विभागाला दिले आहेत.रुपा हत्तीण ही नागझिरा अभयारण्यात येणार्या पर्यटकासांठी आकर्षणाचे केंद्र नेहमीच राहायची आत्ता मात्र पर्यटकांची निराशा होणार आहे.या सर्व हत्तींचे स्थानांतरण १५ फेब्रुवारीपूर्वी संबंधित ठिकाणी करण्याचे निर्देश आहेत.या सर्व स्थानांतरीत हत्तींना वाघाचा मागोवा घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रूपा नावाची हत्तीन आहे.तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी वसंती, मंगला, अजित, राणी, प्रियंका व आदित्य हे सात हत्ती आहेत.येथील सर्व हत्ती, त्यांच्यासाठी वापरले जाणारे प्रशिक्षण व इतर साहित्य तसेच उपलब्ध कर्मचारी यांचे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे स्थानांतरण करावे, या सर्व हत्तींना पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मागोवा घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच चार हत्ती आहेत. नवेगाव-नागझिरा येथील एक हत्ती त्या ठिकाणी स्थानांतरित केला जाणार असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हत्तींची संख्या पाचवर पोहोचणार आहे. नवीन हत्तीला सुद्धा वाघाचा मागोवा घेण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.