संस्कृती टिकविणे युवकांची जबाबदारी- डॉ.बंग

0
12

गडचिरोली,दि.10ः- आदिवासी संस्कृती, त्यांची पारंपरिक गाणी, नृत्य, नाटकांची प्रदीर्घ परंपरा टिकावी यासाठी २० वर्षांपासून शोधाग्राममध्ये युवा संसद आणि जत्रेला सुरूवात कारण्यात आली. आतापर्यंत ही संस्कृती वयोवृद्धांनी सशक्तपणे टिकविली. पण ती तशीच पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता तरु णांची आहे. त्यासाठीच हे आयोजन केले जाते. खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण खेळ म्हटला की स्पर्धा आली. त्यातून कुणी एक जण पुढे जाणार. मात्र असे न होता सर्वांसाठी खेळ, सर्वांसाठी आनंद, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी व्यसनमुक्ती आणि सर्व जण चॅम्पियन ही भावना मध्यवर्ती ठेवून या स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे डॉ. अभय बंग यांनी समारोपीय मार्गदर्शनात सांगितले.

धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथे आयोजित आदिवासी युवा संसद आणि माँ दंतेश्वरी युवा जत्रेची पारंपरिक परांग नृत्याच्या साथीने मोहमाउलीची स्थापना करून उत्साहात सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या विविध कार्यक्रमानंतर चार गटात झालेल्या चर्चेत एकूण ९ ठराव पारित करण्यात आले. डॉ.अभय बंग, डॉ. राणी बंग आणि माजी आमदार हिरामण वरखडे यांच्या हस्ते पालखीचे वहन करण्यात आले.
६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित युवा संसद व जत्रा महोत्सवात कबड्डी आणि व्हॉलिबॉल सामन्यांचे आयोजन केले होते. अखेरच्या दिवशी दंतेश्वरी देवीची पूजा करण्यात आली. मंदिरापासून मोह माउलीची परांग नृत्याच्या साथीने पालखी काढून स्थापना करण्यात आली. या पारंपरिक नृत्यात शोधग्रामचे सर्व कर्मचारीही सहभागी झाले होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कोंदावाही, वाघभूमी, कोवांटोला, पवनी, माळदा, उदेगाव, कुथेगाव, रेखाटोला, साखराटोला, फुलबोडी येथील ग्रामप्रमुखांचा डॉ.अभय बंग, डॉ.राणी बंग आणि माजी आमदार हिरामण वरखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
व्हॉलिबॉल सामन्यांत मुलांमध्ये भीमपूर संघाने तर मुलींमध्ये कोवांटोला संघाने विजय मिळविला. तसेच कबड्डी सामन्यांत मुलांमध्ये फुलबोडी तर मुलींमध्ये माळंदा संघ विजयी ठरला. विजेत्या संघांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.