डोंगरवार दाम्पत्यांनी केली ‘त्यांच्या’वर प्रेमाच्या रंगाची उधळण

0
22

अर्जुनी मोरगाव,(संतोष रोकडे),दि.06ः- रंगाचा उत्सव रंगपंचमी या सणाला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, किंबहुना त्यापेक्षा प्रेमाचे व सामाजिक महत्त्व मोठे आहे. परंतु, केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून, स्वगावापासून दूर राहणार्‍या मजूर वर्गालाही नाईलाजास्तव आपल्या माणसांसोबत हा सण साजरा करता येत नाही. हीच बाब लक्षात ठेवून सामाजिक बांधिलकी जपूवन अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडाच्या सरपंच कुंदा डोंगरवार व त्यांचे यजमान गजानन डोंगरवार या दाम्पत्यांनी रंगोत्सवाला धुळे जिल्ह्यातून झरपडा येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांवर प्रेमाच्या रंगाची उधळण केली.
झरपडा येथे गेल्या एक महिन्यापासून विद्युत पॉवर लाईनचे काम सुरू आहे. या कामावर धुळे येथील ३0 महिला व पुरूष मजूर म्हणून काम करीत आहेत. कामाचे महत्व व वेळ या कारणामुळे हे मजूर इच्छा असतानाही होळी व रंगोत्सवाच्या सणाला स्वगावी जावू शकले नाही. महिनाभरापासून झरपडा येथे राहत असले तरी आपली मायेची, ममतेची मानसे म्हणून घेणारी कोणी नाही. त्यामुळे सण साजरा केला तरी कुठेतरी आनंद हरवलेला राहील, ही बाब डोंगरवार कुटुंबियांच्या लक्षात आली.
त्या मजुरांनाही आपल्या मानणांसोबत रंगोत्सवाचा उत्सव साजरा करण्याचा आनंद मिळावा म्हणून कुंदा डोंगरवार व गजानन डोंगरवार यांनी ग्रामस्थांसह त्यांच्यासोबत रंगोत्सव साजरा केला. मजुर कुटुंबिय त्यांच्या प्रेमाने भारावून रंग व गुलालाची उधळण करीत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. डोंगरवार दाम्पत्यांचा या उपक्रमातून माणूसकीचे दर्शन गावाला घडले. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्या पगाडे, भूमिता मेर्शाम, रविकांत मस्के, राऊत, राष्ट्रपाल रामटेके, पिंटू मेश्राम, अरूण मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.