८५ अपंग मुलांची शस्त्रक्रियेसाठी निवड

0
23

गोंदिया : सर्व शिक्षा अभियानाच्यावतीने येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात घेण्यात आलेल्या शस्त्रक्रिया पूर्व चाचणी शिबिरात ८५ अपंग मुलांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. १0 व ११ मार्च रोजी हे शिबिर घेण्यात आले होते.
याचाच एक भाग म्हणून ज्या अपंग मुलांना शस्त्रक्रियेकरिता प्रस्तावित करण्यात आलेले आहे. अशा मुलांच्या शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना समाजाच्या मुख्यधारेत जोडण्याच्या अनुषंगाने दिनांक १0 व ११मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसीय शस्त्रक्रिया पूर्व चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात जिल्ह्यातील एकूण ८५ अपंग मुलांना शस्त्रक्रिया करण्याकरीता निवडण्यात आलेले आहे.
अपंग मुलं व विद्यार्थ्यांना आपले जीवन जगताना व शिक्षण घेताना अपंगत्वाचा अडथळा नये याकरीता सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिवाय विशेष गरजा असणार्‍या अपंग मुलांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याच्या अनुषंगाने सर्व शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.यात शैक्षणिक सुविधा, वैद्यकीय सेवा व पुर्णसणात्मक सेवा इत्यादीचा समावेश आहे.यात प्रामुख्याने ज्या अपंग विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांचे अपंगत्व दूर होवू शकते. अशा मुलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यात येते.
याच अनुषंगाने शालेय आरोग्य तपासणी व विशेष शिक्षकांनी शोधलेल्या अस्थीव्यंग, वाचादोष, कर्णदोष व दृष्टीदोष असलेल्या जिल्ह्यातील एकूण १६८ विद्यार्थ्यांपैकी ८५ मुलांना शस्त्रक्रिया करण्याकरिता निवड करण्यात आली. शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय व नागपूर येथील सुरज नेत्रालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेकरीता निवडण्यात आलेल्या ८५ मुलांमध्ये अस्थिव्यंग २७, वाचादोष १३ व दृष्टिदोष असलेल्या ४५ मुलांचा समावेश आहे.यात आमगाव तालुक्यातील २२, अर्जुनी-मोरगांव ९, देवरी १५, गोंदिया ७, गोरेगाव १0, सडक-अर्जुनी ८, सालेकसा ११ व तिरोडा ४ अशा मुलांचा समावेश आहे.
ही शस्त्रक्रिया पुर्व तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ञ डॉ. अजय घोरमारे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मरस्कोल्हे, व डॉ. मनोज राऊत व सुरज नेत्रालय नागपुरचे डॉ. रितेश शुक्ला यांनी केली.शिबिराचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या मार्गदर्शनात अपंग समावेशित शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे व विलास मलवार यांनी केले.
शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व तज्ञ, अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत नियुक्त तालुका समन्वयक विशेष शिक्षक, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत नियुक्त कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, औषधी निर्माता व विशेषत: जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.