गोव्यात गांधी जयंतीची सुटी रद्द

0
14

पणजी-गोवा सरकारने गांधी जयंतीला सरकारी सुटीच्या यादीतून वगळल्याने एकच खळबळ माजली आहे.गोवा सरकारच्यावतीने 2015 वर्षासाठी जारी केलेल्या सुट्यांच्या यादीत 2 ऑक्टोबर या दिवसाचा ‘नॅश्लन हॉलिडे’ म्हणूृन उल्लेख न करता ‘वर्किंग डे’ म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून काँग्रेसने तर सत्ताधार्‍यांच्या या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या सरकारने नुकताच या वर्षाच्या सरकारी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये गांधी जयंतीनिमित्त दिली जाणारी सरकारी सुटी रद्द करण्यात आली आहे.
2001 मध्ये राज्याचे तत्कालीन मनोहर पर्रिकर सरकारनेही गांधी जयंतीला सरकारी सुटी न देण्याचा आदेश दिला होता. परंतु हा आदेश तातडीने मागे घेण्यात आला होता. त्यामुळे गोव्यात मागच्या वर्षीपर्यंत 2 ऑक्टोंबरला सुटी दिली जात होती. पण यंदा ही सुटी का रद्द करण्यात आलीये, असा सवाल काँग्रेसचे स्थानिक नेते दुर्गादास कामत यांनी उपस्थित केला. ‘गोव्यातील विद्यमान सरकारने आता नथुराम गोडसे यांच्या जन्मदिनी सुटी द्यायला नको,’ असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

एकीकडे ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या भव्य पुतळ्याचं अनावरण होत असताना गोवा सरकारनं ही सुटी रद्द करणं, ही अत्यंत दुदैवी बाब असल्याचं काँग्रेस प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.