तरुणांच्या कौशल्य विकासासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण – मुख्यमंत्री

0
15

मुंबई : राज्यातील तरुणांमध्ये उद्यमशीलता वाढीस लागावी म्हणून शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास शिबीरांच्या आयोजनासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जागतिक मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे शुक्रवारी शिवाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, चेंबर्सचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खासदार शिवाजीराव आढळराव, चेंबर्सचे सरचिटणीस सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मराठी तरुणांमध्ये उपजत असलेल्या कार्यक्षमतेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. राज्यातील गुंतवणूक वाढावी यासाठी उद्योगांना लागणारी परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून विजेचे दरही कमी करण्याचा विचार आहे. कच्च्या मालचे उत्पादन होणाऱ्या क्षेत्रातच उद्योग उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.

श्री. देसाई म्हणाले की, मोठ्या उद्योगांबरोबरच लघु उद्योगांनाही चालना मिळावी, यासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. जायका ग्रुपचे अध्यक्ष प्रफुल्ल काळे, सुगी ग्रुपचे अध्यक्ष निशांत देशमुख, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक महेश कोठारे, टेक्स्टाईल उद्योजक प्रदीप मराठे व कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांना यावेळी उद्योगरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.