‘दाभडी’त काँग्रेसची आज ‘चाय की चर्चा’

0
10

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे २० मार्च २०१४ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना विविध आश्वासने दिली होती. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मोदी यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी दाभडी येथे शुक्रवार, २० मार्च रोजी काँग्रेसने शेतकऱ्यांसोबत ‘चाय की चर्चा’ आयोजित केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी गुरुवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोदी यांनी दाभडी येथील ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. त्यात उत्पादन खर्चात ५० टक्के नफा समाविष्ट करून शेतमालाचे भाव ठरविणे, अत्यल्प दरात कर्जपुरवठा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न, कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग आदींचा त्यात समावेश होता.

शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवून भाजपाला भरभरून मते दिली. मात्र सत्तेत आल्यावर केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने आश्वासनपूर्तीबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे.

पुढील चार वर्षांत तरी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे म्हणून मोदी यांनी निवडलेल्या दाभडी येथे आर्णी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे दु. ३ वा. शेतकऱ्यांसोबत ‘चाय की चर्चा’ होणार आहे.

या कार्यक्रमाला शिवाजीराव मोघे यांच्यासह खासदार राजीव सातव, काँग्रेस नेते बाला बच्चन आणि तेलंगणचे काँग्रेस नेते रामचंद्र रेड्डी यांच्यासह मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातीलही शेतकरी उपस्थित राहणार आहेत, असे मोघे यांनी सांगितले.