किल्ल्यांच्या संवर्धनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन

0
7

मुंबई–महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे राज्याच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. या इतिहासाचे कायमस्वरुपी जतन करण्यात येईल. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनाची नवीन पिढीला ओळख करुन देण्यासाठी आणि राज्यातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत गड – किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्यांच्या संवर्धनासंदर्भात विद्या चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरवस्था झाली असून, त्याची डागडुजी करणे अतिशय महत्वाचे आहे, त्यादृष्टीने राज्य सरकारच्या वतीने या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांची एक समिती नेमली आहे. ही समिती संवर्धनाचा आराखडा तयार करेल तसेच या गड किल्ल्यांवर पर्यटकांचा जास्तीत जास्त ओढा वाढेल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. राज्यातील काही किल्ले हे राज्य सरकाराच्या अंतर्गत आहेत तर काही किल्ले हे केंद्र सरकारच्या पुरातन खात्यांतर्गत येतात. ज्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केद्राचा अधिक निधी आवश्यक आहे, त्यासाठी आपण नुकतीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली आहे, त्यांनीही सकारत्मक प्रतिसाद दिल्याची माहिती तावडे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेचा वारसा असलेल्या रायगड किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सध्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे असलेला रायगड किल्ला राज्य सरकारच्या अखत्यारित्य आणण्यासाठी केद्राला विनंती करण्यात आली आहे. तसेच नजीकच्या काळात रायगड किल्ल्यावर रायगड महोत्सवाचे आयोजन करण्याचा सरकारचा मानस आहे. साधारण आठवडावर रायगड महोत्सवाचे आयोजन करुन शिवाजी महाराजांच्या काळातील शिवसृष्टीची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न आहे. या महोत्सवाच्या काळात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा, शिवकालीन बाजारपेठ, शिवसृष्टी उभारण्यात येईल, जेणेकरुन शिवाजी महाराजांच्या काळातील शिवसृष्टीच्या स्मृतींना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने देश विदेशातील अनेक पर्यटक या महोत्सवाला येतील, असा विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला.
विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये ऋषिकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले,वी. रा. पाटील,प्र. के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर, संकेत कुलकर्णी आदी सदस्यांचा समावेश आहे.