नारायण राणेंचे वांद्रेत जोरदार शक्तीप्रदर्शन, आबांच्या पत्नीनेही दाखल केला अर्ज

0
11

मुंबई- कोण आला रे कोण आला .. काँग्रेसचा वाघ आला. काँग्रेस पक्षाचा विजय, नारायण राणे आगे बढो .. हम तुम्हारे साथ है.. अशा गगनभेदी घोषणांनी वांद्रे पूर्व परिसर दणाणून गेला. सर्व जातीधर्मातील लोकांच्या उपस्थितीत, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रत्येकाच्या मनात जिंकण्याचा निर्धार, अशा उत्साही वातावरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. यावेळी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (गवई) गटाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
दरम्यान, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी अर्ज दाखल केला. भाजपच्या स्वप्निल पाटील यांनी बंडखोरी करीत सुमन पाटील यांच्याविरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, जयंत पाटील, प्रकाश शेंडगे, विलासराव शिंदे आदी उपस्थित होते.
या मिरवणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार नसीम खान, माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार वर्षा गायकवाड, आमदार जनार्दन चांदूरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)चे राजेंद्र गवई, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय दिना पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (गवई गट)चे हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.