विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस सांगणार दावा

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास कोणतीही अडचण नाही.
दरम्यान, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विशेष अधिवेशनापूर्वी होईल. त्या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांची मते जाणून विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गांधीभवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारला येत्या पंधरा दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यापूर्वी नव्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे काँग्रेसकडून अभिनंदन करण्यात आले. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनाही सत्तेत सहभागी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस हाच सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरतो. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे ठाकरे म्हणाले.
यापूर्वीही काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. त्यामुळे एक सक्षम आणि मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राज्यातील जनतेसाठी विधानसभेत काम करणार आहे. विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांकरता काँग्रेस निश्चितच सरकारला पाठिंबा देईल. मात्र सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येणा-या गोष्टी सरकारकडून होणार असतील, तर त्याला सभागृहाबरोबरच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरूनही विरोध केला जाईल. काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना, सर्व समाजघटकांना दिलेली आरक्षणे बदलण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसकडून विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेनंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास आपोआप हे पद काँग्रेसला मिळण्यात काही अडचण येणार नाही. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे.