सोलापूर – दरवर्षी प्रथेप्रमाणे कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. पण नव्या सरकारमध्ये हे पद नसल्याने महापुजेचा मान ज्येष्ठ मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. त्यामुळे सोमवारी (ता.३) कार्तिकीची महापूजा खडसे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्तिकी एकादशीचा सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची रिघ पंढरीत लागली असून, आज (शनिवारी) दुपारी दर्शन रांग चंद्रभागा घाटाच्यापुढे गोपाळपूर रस्त्याच्या शेडपर्यंत गेली होती. चंद्रभागेच्या वाळवंटासह नगरप्रदक्षिणा मार्गावरही विठुनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. सुमारे दीड लाख वारकरी दाखल झाले आहेत. कार्तिकीचा मुख्य सोहळा सोमवारी असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून एस.टी. आणि रेल्वेसह वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. राज्याच्या काही भागातून विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्याही येत आहेत. पंढरपुरातील गर्दी क्षणोक्षणी वाढते आहे. शहरातील धर्मशाळा, मठ, आश्रमांमध्ये किर्तन, प्रवचन, भजनाचे सूर आळवले जात आहेत. वाळवंटातही ठिकठिकाणी भजने आणि किर्तने सुरु आहेत. टाळ-मृदंगाच गजर आणि ज्ञानोबा-तुकाराम…माऊली-माऊलीचा जयघोषाने वातावरण भक्तिने भारुन गेले आहे. विशेषतः वाळवंटासह नगरप्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांची गर्दी वाढते आहे. याच भागात खेळणी, प्रसादाच्या विक्रेत्यांमुळे हा मार्ग फूलून गेला अहो. दर्शनरांगेत शनिवारी वारकऱ्यांची गर्दी आणि वेगही वाढला.
नाथाभाऊंना पावला ‘विठ्ठल‘
आषाढी यात्रेत शासकीय महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची महापुजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते असा रिवाज आहे. पण नव्या सरकारची आताच स्थापना झाली आहे. शिवाय या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री हे पद नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापुजा करतील, अशी शक्यता होती. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना महापुजेसाठी मान दिला आहे. त्यामुळे आता सोमवारी (ता.३) पहाटे अडीच वाजता खडसे यांच्या हस्ते सपत्निक ही महापुजा होईल. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून खडसे अनेकदा महापुजेला उपस्थित राहिले. पण सत्ताधारी मंत्री म्हणून त्यांच्या हस्ते महापुजा होत असल्याने खऱ्या अर्थान नाथाभाऊंना विठ्ठल पावला, असे म्हटले जाते आहे.