डॉ. आंबेडकर वास्तूच्या खरेदीसाठी शिष्टमंडळ लंडन दौऱ्यावर

0
9

मुंबई-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या लंडनमधील घराची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राचे दोन मंत्री व सचिव दर्जाचा एक सनदी अधिकारी येत्या १७ ते २१ एप्रिलदरम्यान लंडनचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या खर्चासाठी १५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असून, घर खरेदी प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून लंडनमधील संबंधित सॉलिसिटरच्या खात्यात तीन कोटी दहा लाख रुपये अगोदरच जमा करण्यात आले आहेत.
लंडनमधील १०, किंग्ज हेन्री रोड, एन. डब्ल्यू ३ या घरात सन १९२१-२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले असल्याने, भारतीयांच्या भावना या वास्तूशी निगडित आहेत. या वास्तूचे जतन करण्यासाठी ती खरेदी करावी, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारला सुचविल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानेही तसा प्रस्ताव संमत केला व खरेदी प्रक्रिया सुरू झाली. ही वास्तू तेथील मूळ मालकाने सप्टेंबर २०१४ मध्येच विक्रीस काढली असल्याने, ती अन्य इच्छुक खरेदीदारांऐवजी महाराष्ट्र सरकारला विकत घेता यावी याकरिता किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३.१० कोटीं रुपये एवढी रक्कम सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या भाग भांडवलातून तातडीने अदा करण्यात आली. शासन स्तरावर मात्र या प्रक्रियेकरिता निधी उपलब्ध करण्यात काही तांत्रिक कारणांमुळे विलंब लागणार असल्याने, मंत्री व अधिकाऱ्यांच्या लंडन दौऱ्याचा १५ लाखांचा खर्चदेखील म. फुले महामंडळाच्या तिजोरीतूनच करण्यात येणार आहे.
या खर्चास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याने, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल उके या तिघांचे शिष्टमंडळ १७ ते २१ एप्रिल दरम्यान लंडनला जाऊन घर खरेदीच्या प्रक्रियेचा पुढील टप्पा पूर्ण करणार आहेत. या दौऱ्यास केंद्र सरकारच्या विदेश मंत्रालयानेही मंजुरी दिली आहे.