राज्यपाल उद्यापासून विदर्भात

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर -राज्यपाल सी. विद्यासागर राव येत्या ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अमरावती, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात जातील. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच विदर्भ दौरा आहे.

बुधवारी अमरावती येथे सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता ते धारणी येथे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अॅग्रीकल्चर टेक्निकल स्कूलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता धारणी येथे ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी, आरोग्य केंद्राला भेट देतील. त्यानंतर धारणी विश्रामगृहात विविध विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. ६ तारखेला सकाळी १० वाजता राज्यपाल कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथे उदबत्ती उत्पादन प्रकल्पाला भेट देतील, ११.४५ वाजता गडचिरोली येथे हस्तकला केंद्राला भेट, १२.३० वाजता इंग्रजी आश्रम शाळेला भेट, दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहाचा कोनशीला समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर १२ वाजता कवी कुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे व्ही. राजेश्वर राव यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.