केदारनाथला पायी चालत आले राहुल गांधी

0
19

नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी केदारनाथ येथे पोहोचले आहेत. शुक्रवारी सकाळी ते केदारनाथाचे दर्शन घेतील. मंदिराचे द्वार सकाळी 8.50 वाजता उघडले आहे. शुक्रवारी पाहाटेच जिल्हा प्रशासन आणि मंदिराच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत मंदिराचा दक्षिण दरवाजा उघडण्यात आला. राहुल गांधी सहा किलोमीटर पायी चालत केदारनाथ येथे पोहोचले आहेत. गुरुवारची रात्र त्यांनी गौरीकुंड आणि केदारनाथ दरम्यानच्या लिनचोली येथे मुक्काम केला होता. काँग्रेस उपाध्यक्ष गुरुवारी दिल्लीहून देहरादून आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने रुद्रप्रयागच्या गौरीकुंड येथे पोहोचले. तेथून त्यांनी केदारनाथची पदयात्रा सुरु केली. लिनचोली पर्यंतचे 11 किलोमीटर अंतर त्यांनी पाच तासात कापले.
राहुल गांधी यांच्या केदारनाथच्या पदयात्रे दरम्यान त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते आहेत. त्यात मुख्यमंत्री हरीश रावत, प्रदेश प्रभारी अंबिका सोनी, प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आहेत.
केदारनाथ येथील प्रवेशद्वार उघडण्याच्या परंपरेनुसार केदारनाथाची डोली गुरुवारी गौरीकुंडाहून केदारनाथ येथे पोहोचली. गौरीकुंड येथे गौरी मातेच्या मंदिरात रात्रभर मुक्काम केल्यानंतर केदारनाथाची पूजा करण्यात आली. सकाळी आठ वाजता डोलीने प्रस्थान केले आणि सायंकाळी केदारनाथ येथे पोहोचली.