वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

0
7

चंद्रपूर-वनविकास महामंडळाच्या जंगलादरम्यान जुनोना-गिलबिली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अवघ्या सव्वा वर्षाच्या वाघाच्या (मादी) पिलाचा मृत्यू झाल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. याच परिसरात गत वर्षभरापासून वाघांचा मृत्यू, शिकारीचे प्रयत्न आणि आरोपींना अटक यांचे सत्र सुरू आहे. जुनोनाच्या जंगलात मृत पिलाची आई व इतर भावंडही असल्याने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जात आहे.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या जुनोनाच्या जंगलात गावातील काही महिला व पुरुष मोहफुले वेचण्यासाठी गेले असता जुनोना-गिलबिली मार्गावर रस्त्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ४७६ मध्ये वाघाचे पिलू मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. गावकर्‍यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक एस. एस. डोळे पथकासह घटनास्थळी आले असता, वाघाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. लेखानी, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, वन्यजीव अभ्यासक डॉ. योगेश दुधपचारे, संजय वैद्य यांनाही बोलाविण्यात आले. सर्वांसमक्ष पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन केले असता, अवघ्या सव्वा वर्ष वयाच्या या वाघिणीचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. जंललातून जाणार्‍या रस्त्यांवर वाहनांना वेगमर्यादा असावी, असे मत डॉ. दुधपचारे यांनी व्यक्त केले.